नान्नजमध्ये सहा बॉम्ब असल्याचा मुंबई कंट्रोलचा दुरध्वनी; वाचा पुढे काय झाले

जिल्ह्यातील पोलीस दलांची धावपळ
नान्नजमध्ये सहा बॉम्ब असल्याचा मुंबई कंट्रोलचा दुरध्वनी; वाचा पुढे काय झाले

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये 6 बॉम्ब ठेवले असल्याची माहिती मुंबई पोलीस कंट्रोलकडून अहमदनगरच्या अधिक्षक तसेच अधिकार्यांना मिळाली. यामुळे अहमदनगर पोलीस, बॉम्बशोधक पथकासह जामखेड पोलीसांची दिवसभर धावपळ उडाली होती. तपासात मात्र काहीच आढळून न आल्याने ही अफवा असल्याचे समोर आले. तर मुंबई कंट्रोलला दुरध्वनी करणार्या एकास मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनेश सुतार (पत्ता माहिती नाही) असे संशयिताचे नाव असून त्यास मुंबई एलटी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.18) जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकल या दुकानात बॉम्ब ठेवल्याची खबर मुंबई कंट्रोलच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून सकाळी दहा वाजता अहमदनगर व जामखेड पोलीसांना मिळाल्यानंतर जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोस, पोलिस कर्मचारी आबा आवारे, सतीश दळवी, नवनाथ शेकडे हे फौजफाट्यासह बालाजी मेडिकलजवळ सकाळी दहा वाजता दाखल झाले. जामखेड पोलिसांनी दिवसभर बालाजी मेडिकलसह परिसराची तपासणी करून तेथे लक्ष केंद्रित केले.

तर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नगर येथील बॉम्बशोधक व निकामी करणार्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मुरकुळे, हवालदार एस.सी. येटेकर, पोलिस नाईक सतीश तवार, उमेश मोरे, दिनेश पळलकर, अंकुश कुलांगे, कॉन्स्टेबल गौरव भिंगारदिवे, देविदास शेंडे, रोहित कांवळे, अरुण गायकवाड, गडदे आदी नान्नजमध्ये दाखल झाले. मेडिकलसह संपूर्ण परिसराची या पथकाने तपासणी केली. श्वान पथकातील जंजीर या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र पथकास बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गावातील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची वार्ता गावात वार्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मेडिकल परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

या प्रकरणी मुंबई पोलीसांना बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणारा संशयित दिनेश सुतार यास अटक केली आहे. लवकरच आरोपीला जामखेड पोलीस ताब्यात घेणार आहेत. सुतार यावर अफवा पसरवणे, सार्वजनीक ठिकाणी गैर वर्तन करणे, बदला घेण्यासाठी मृत्यु घडवून आणण्याचा प्रयत्न, खोटी माहिती देणे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

विनयभंग प्रकरणातून प्रकारसंशयित सुतार याने सोशल मिडीयातून ओळख करून नान्नज येथील एका मुलीस त्रास देत होत. तीच्या तक्रारीवरून सुतार यावर दहा दिवसांपुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच त्याने नान्नज गावातील वीस ते पंचवीस मुलांना दुरध्वनी करून सबंधीत मुलगी आपली पत्नी असून तीला त्रास देतो असे म्हणुन पैशांची मागणी केली आहे. या मुलांसह त्याने बालाजी मेडिकलच्या मालकालाही अशीच धमकी दिली होती. यातूनच त्याने बालाजी मेडिकलमध्ये बॉम्ब असल्याचा दुरध्वनी मुंबई पोलीसांना केल्याचे समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com