पाणी व मातीची किंमत करणारी गावेच आदर्श झाली
सार्वमत

पाणी व मातीची किंमत करणारी गावेच आदर्श झाली

ऑनलाईन कार्यशाळेत राज्याचे मृद व जलसंधारण सचिव नंदकुमार यांचे प्रतिपादन

Arvind Arkhade

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

राज्यातील 44 हजार गावांपैकी केवळ 100 गावेच का आदर्श झालीत याचा मागोवा घेतला तर ज्या गावातील लोकांनी जलसंधारणाची कामे केली, पाणी आणि मातीची किंमत केली तीच आदर्श झाली आहेत असे लक्षात येते, असे प्रतिपादन राज्याचे मृद-जलसंधारण व रोहयो विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.

जलसाक्षरता केंद्र यशदा, पुणे यांचेवतीने ‘पाण्याच्या ताळेबंदामध्ये ग्रामपंचायत आणि महिलांचा सहभाग’ या विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. नंदकुमार बोलत होते. राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार,जलसंधारण विभागाचे संचालक कैलास मोते, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर विमला, यशदाच्या उपमहासंचालीका नयना गुंडे, जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे, जलनायक रमाकांत बापू कुलकर्णी, डॉ. विनोद बोधनकर, जलमित्र सुखदेव फुलारी यांच्यासह जलसाक्षरता चळवळीतील जलयोद्धे, जलनायक, जलप्रेमी, जलदूत सहभागी झाले होते.

श्री.नंदकुमार म्हणाले,राज्यातील 4500 ग्रामपंचायतीनी अजून पर्यंत रोजगार हमीचे एकही काम घेतलेले नाही. जणू काही रोजगार हमी हे फक्त मजबूर लोकांचेच काम आहे. तसे असेलही पण मग पुन्हा एक प्रश्न पडतो की मग तुमचे गाव समृद्ध झालंय का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. ज्या ग्रामपंचायतीनी रोजगार हमीची कामे घेतली त्यात वैयक्तिक लाभाचीच अधिक कामे आहेत तर जलसंधारणाची कामे घेतली गेली नाहीत.

शाश्वत विकास करताना त्याच्या नियोजनामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती अपरिहार्य आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासासाठी नक्की हातभार लावणार आहे. कोव्हिड पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात स्थलांतर झालेले आहे. याकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिल्यास रोजगार हमीचा उपयोग करून घेता येऊ शकेल. 2 ऑक्टोबर रोजी गावाचे मजूर अंदाजपत्रक (लेबर बजेट) तयार होते.

या अंदाजपत्रकाच्या आधी गावात या संबंधित दहा प्रशिक्षित व्यक्ती तयार होणे गरजेचे आहे. सर्व शासकीय विभाग आणि जलसाक्षरतेचे सर्व संवर्ग यांनी प्रत्येक गावातून किमान दहा व्यक्तींना ज्यात पन्नास टक्के महिला असतील प्रशिक्षित केल्यास राज्यात सुमारे चार लाख चाळीस हजार प्रशिक्षित व्यक्तींची फळी निर्माण होईल.

राज्यातील आदर्शगाव योजनेचा आढावा घेताना मला असा प्रश्न पडला की राज्यातील 44 हजार गावांपैकी केवळ 100 गावेच का आदर्श झाली. बाकीच्या गावांना आदर्श होण्याचा हक्क नाही का? की ती आदर्श होऊच शकत नाहीत म्हणून आपण त्यांना राईटअप करून ठेवले काय ? अधिक चर्चेनंतर असे लक्षात आले की प्रत्येक गाव आदर्श नाही होणार पण आदर्श होण्याकडे वाटचाल तर करू शकतात.

मग त्यांना आदर्श गावाकडे नेणारे रस्ते आपण तयार केले का? थेट 100 गुणांची अपेक्षा ठेवण्यापेक्षा बाकीच्यांना 35 वरून 45 आणि 55 वरून 65 असे करत करत 100 गुणांपर्यंत न्यायचे आहे. त्यासाठी आदर्श गावाकडे वाटचाल करणारे गाव हे नवीन घोष वाक्य आणले आहे.

आपली सर्व गावे ही शेतीवर आधारीत आहेत. शेती आधारीत गावात पाणी आणि मातीची किंमत केली गेली नाही तर ती गावे बिन पाण्याची बुडून मरतील. शेती बरोबर होत नसेल तर गाव गरीबच राहील, लोकं विस्थापित होतील.हे टाळण्यासाठी जलसाक्षरता चळवळीतील प्रत्येकाने दररोज किमान 10 गावांतील लोकांना जलसाक्षर केले पाहिजे.

ज्याला पाण्याबद्दल समजते त्यांनी पाणी न समजणार्‍या लोकांचे प्रबोधन करावे. त्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा,तालुक्याचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावरून माहिती द्यावी, असे आवाहन केले.

राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर विमला, पाण्याचा ताळेबंद प्रशिक्षक जलनायक रमाकांत बापू कुलकर्णी, प्रा.परमेश्वर पौळ,कुंडल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्रीधर कुलकर्णी, जलदूत अंजली कोतकर, कविता शिंदे, रवींद्र इंगोले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे यांनी या ऑनलाईन कार्यशाळेचे संचालन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com