श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या दि. 27 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर 710 व्यक्तींनी 66 हरकती दाखल केलेल्या आहेत.

या हरकतींची सुनावणी दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कार्यालयात घेतली जाणार आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याने जानेवारी 2020 मध्ये 9 हजार 589 व्यक्तिगत सभासदांची आणि 10 संस्था सभासदांची प्रारूप यादी पात्र ठरवून प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्याकडे पाठवलेली होती.

ही यादी प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांनी दि. 17 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करून त्यावर दि. 27 जानेवारी 2020 पर्यंत हरकती व आक्षेप मागविले होते. कोव्हिडमुळे गेली वर्षभर निवडणूक प्रक्रिया सुनावणीच्या टप्प्यावर थांबलेली होती. नागवडे साखर कारखान्याच्या 33 सभासद संस्थांनी प्रारूप यादीवर 8 हरकती नोंदविलेल्या आहेत.

तर 670 व्यक्तिगत सभासदांनी 58 हरकती नोंदविलेल्या आहेत. एकूण 66 हरकतींची सुनावणी गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कार्यालयात होणार असून तशा नोटिसा साखर कारखान्यामार्फत बजावण्याचे काम चालू आहे.