श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने आपल्या 43 सोसायट्यांंपैकी 33 सोसायट्यांना अक्रियाशील ठरवून त्यांचे ठराव घेतलेले नाहीत.

कारखान्याची ही प्रक्रिया बेकायदेशीर असून, त्या विरुद्ध आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत, अशी प्रतिक्रिया श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी शेतकर्यांच्या मेळाव्यात व्यक्त केली.

प्रा. दरेकर म्हणाले, व्यक्तिगत सभासद किंवा सोसायटी सभासद यांना अक्रियाशील ठरविण्यासाठी सहकार कायद्याप्रमाणे दर वर्षी 30 एप्रिलपर्यंत नोटीस देणे गरजेचे आहे. परंतु नागवडे सहकारी साखर कारखान्याने पाच वर्षात एकही नोटीस दिलेली नाही आणि नोटीस न देता थेट अक्रियाशील ठरविणे ही बाब कायदेशीर नाही.

याबाबत आम्ही प्रादेशिक सहसंचालक, अहमदनगर यांच्याकडे हरकती घेतलेल्या आहेत. त्याची सुनावणी 15 फेब्रुवारीनंतर घेतली जाणार आहे. या सुनावणीत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर हे प्रकरण आम्ही उच्च न्यायालयात दाखल करून न्याय मागणार आहोत.

नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी सभासद सोसायट्यांच्या चेअरमनचा मेळावा मढेवडगाव येथे जिजाबापू शिंदे यांच्या वस्तीवर बोलविला होता. त्या मेळाव्यात प्रा. दरेकर यांनी कायदेशीर बाजू मांडली.

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्री. केशवराव मगर यांनी कारखान्याच्या गेल्या पाच वर्षातील कारभारावर आणि केलेल्या भ्रष्टाचारावर अनेक उदाहरणे देऊन टिका केली. संचालक मंडळाला विश्वासात न घेता चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी खरेदीच्या ऑर्डर स्वतः परस्पर दिल्या. कमी दर करण्यासाठी व्यापार्यांशी वाटाघाटी कधीच केल्या नाहीत. त्यामुळे कारखान्याचा फार मोठा तोटा झालेला आहे. हे आम्ही सर्व निवडणुकीमध्ये मांडणार आहोत.

बाळासाहेब काकडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अण्णासाहेब शेलार, दिपक भोसले, दत्तात्रय पानसरे, टिळक भोस, घन:शाम शेलार आदी मान्यवरांनी नागवडे कारखान्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. जिजाबापू शिंदे यांनी आभार मानले. या मेळाव्याला डॉ.नागवडे, अजित जामदार, संजय जामदार, बबनराव मदने, शांताराम भोयटे व अनेक सोसायट्यांचे चेअरमन उपस्थित होते.