नगरपंचायत निवडणुकीसाठी खा. विखेंनी घेतल्या मुलाखती

नगरपंचायत निवडणुकीसाठी खा. विखेंनी घेतल्या मुलाखती
शिर्डी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शिर्डी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या मुलाखतीमध्ये यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी असणार्‍या आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या सुमारे 300 व्यक्तींनी मुलाखती दिल्या आहेत.

शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवकपद राजकीयदृष्ट्या एक स्टेटस ऑफ सिम्बॉल बनत चालल्याने या वेळच्या निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा असणार्‍या भावी उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला आपल्या हाय कमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आपली निवडणूक प्रक्रिया सोपी होईल. तसेच उमेदवारी निश्चित होईल यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपले प्रेझेंटेशन हाय कमांड समोर अधोरेखित करत आहे.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी शनिवारी शिर्डी येथील संपर्क कार्यालयात मुलाखती ठेवल्या होत्या. दुपारी 3 वाजेपासून मुलाखती सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरु होत्या. जवळपास तीनशेच्या दरम्यान इच्छुकांनी खा. सुजय विखे पाटील यांच्यासमोर मुलाखती दिल्या आहे. मुलाखत देऊन ज्याने त्याने आपली उमेदवारी बळकट करण्यासाठी आपण काय करणार किंवा आपण योग्य उमेदवार कसे ठरू शकतो याबाबतचा खुलासा केला असेल.

यावेळी अनेक दिग्गज मातब्बर व प्रस्थापित पुढारी मुलाखत देण्यासाठी संपर्क कार्यालयाच्या बाहेर उभे होते. मुलाखतीच्या कालावधी दरम्यान संपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे शिर्डी नगरपंचायत निवडणुकीची यंदाची राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगतदार होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.

खा. विखे पाटील यांनी मुलाखत घेतल्यानंतर पुन्हा मुलाखती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपली उमेदवारी केव्हा निश्चित होईल व आपण केव्हा कामाला लागू या प्रतीक्षेत काही नवे चेहरे आहेत तर काही मुरब्बी उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी निश्चित मिळेल असे समजून अवधी कमी असल्याचे लक्षात घेत आपली यंत्रणा कामाला लावली असल्याचीही चर्चा आहे.

निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून आपल्याला आपल्या पक्षीय नेतृत्वाकडून उमेदवारीचा ग्रीन सिग्नल लवकर मिळावा याच प्रतीक्षेत आता मुलाखती दिलेले उमेदवार दिसून येत आहे. 17 जागांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्याने आता त्यातून कोण कोणाला ग्रीन सिग्नल मिळतो हे बघणे मात्र मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.