अहमदनगर (प्रतिनिधी) -

शहरामध्ये सध्या उड्डाणपूलासह विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उभी राहिली आहे. शहरातील वाहतूकीचे नियोजन

करण्याचे काम शहर वाहतूक शाखेकडे आहे. वाहतूक शाखेकडे अधिकारी व कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत आहे. सध्या दोन अधिकारी व 58 कर्मचारी वाहतूक शाखेत काम करीत आहे.

नगर शहरातून प्रमुख महामार्ग जातात यामुळे शहरात नेहमी वाहतूकीची वर्दळ असते. करोना काळात बंद असलेली रस्त्याची कामे एकाच वेळी सुरू झाली आहे. तसेच उड्डाणपुलाचे कामही सुरू झाले आहे. यामुळे शहरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपूल, रस्त्याची कामे, वाहतूक समस्या, धूळ यामुळे नगरकर प्रचंड हैराण झाले आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्याचे काम शहर वाहतूक शाखेकडे आहे. शहरातील अनेक सिंग्नल बंद अवस्थेत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी शहर वाहतूक शाखेला पूर्वी एक निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व सुमारे 80 पोलीस कर्मचारी होते. परंतु, सध्या शहर वाहतूक शाखेमध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक व 20 पोलीस कर्मचारी कमी आहेत.

एक निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक व 58 कर्मचारी वाहतूक शाखेकडे आहेत. साप्ताहिक सुट्ट्या, रजा यामुळे 20 ते 25 कर्मचारी दररोज सुट्टीवर असतात. 25 ते 30 कर्मचारी दररोज ड्यूटीवर असतात. या कर्मचार्यांवर शहर वाहतूकीचा भार आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूक शाखेला जास्त कर्मचार्याची गरज आहे. विविध कारणामुळे शहरात कायमच वाहतूक कोंडी होत असते. त्यात आता उड्डाणपूल, रस्त्याची कामे व इतर कारणामुळे दररोजच वाहतूक कोंडीला नगरकरांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक शाखेकडे जास्त कर्मचारी उपलब्ध झाल्यास वाहतूकीचे चांगले नियोजन करता येईल. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शहर वाहतूक शाखेला जास्त कर्मचारी वाढवून द्यावेत अशी मागणी होत आहे.

वाहतूक शाखेकडे उपलब्ध कर्मचार्यावर वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. उड्डाणपूल, रस्त्याची कामे यामुळे वाहतूक कोंडी होते. सध्या सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानातून नगर शहरातील चौका- चौकात वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जात आहे. नगरकरांनी वाहतुकीचे नियम पाळले तर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. वाहतूक शाखेकडे कर्मचारी कमी असल्याने आम्ही कर्मचारी वाढवून मिळावे अशी मागणी केली आहे. लवकरच कर्मचारी मिळतील. कर्मचारी वाढून मिळाल्यास शहरातील प्रमुख चौकांमध्ये कर्मचारी नियुक्त करता येईल.

- पोलीस निरीक्षक विकास देवरे,

(नगर शहर वाहतूक शाखा)