नगर अर्बनच्या सस्पेन्स घोटाळ्यात गांधी कुटुंबिय आरोपीच्या पिंजर्‍यात

सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन मल्टीस्टेटशेड्युल्ड बँकेत घडलेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्यात बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव व नगर मनपाचे भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी, तसेच या गांधी बंधूंची चुलती संगीता अनिल गांधी यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता येत्या 1 जूनला होणार आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या विद्यमान सत्ताधार्‍यांचे मार्गदर्शक मानले जाणारे सुवेंद्र गांधी यांना सस्पेन्स घोटाळ्यात आरोपी केल्याने बँकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अर्बन बँकेच्या सस्पेन्स खात्यातून 15 धनादेश वटवले गेले असून, यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहेत. बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेला पाच लाखांचा दंडही केलेला आहे. या पार्श्वभूमीवर सस्पेन्स खात्यातील या गैरव्यवहारांबद्दल चौकशीची मागणी होत होती. त्यातून न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते.

मात्र, बँकेचे लेखा परीक्षण करणार्‍यांच्या सरतपासणीत गांधी परिवारातील सुरेंद्र व देवेंद्र गांधी या बंधूंचे व संगीता अनिल गांधी या त्यांच्या चुलतीचे नाव स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना आरोपी ठरवून समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या तिघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या येत्या सुनावणीस त्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे. नगर येथील न्यायालयात केस नंबर 714/2016 मध्ये न्यायमूर्ती श्रीमती पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे समन्स बजावले आहेत.

दरम्यान, बँकेचे 2009-10 चे वैधानिक लेखापरीक्षक मे. गिरासे, पाटील, पवार, डावरे अँड असोसिएशन यांना त्यांच्या लेखा परीक्षणादरम्यान एक गंभीर घोटाळा लक्षात आला. बँकेचे तत्कालीन चेअरमन (स्व.) दिलीप गांधी यांची मुले सुरेंद्र गांधी, देवेंद्र गांधी व भावजयी संगीता अनिल गांधी व गांधी परिवाराच्या मालकीची फर्म मे. मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या खात्यात पैसे शिल्लक नसताना मोठ्या रक्कमांचे चेक पास झाले आहेत व नगर अर्बन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील सस्पेंस खात्यातील रक्कमांचा गैरवापरकरून हे चेक पास झाले होते.

या गुन्ह्याबद्दल संबंधित वैधानिक लेखापरीक्षकांनी नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिष्टर नंबर 40/2015 दाखल केला होता. परंतु या गुन्ह्याचे चार्जशीट दाखल होताना आश्चर्यजनकपणे गांधी परिवाराची नावे आरोपींच्या नावांतून वगळली गेली होती. याबाबतचा सर्व ठपका बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ठेवण्यात येवून त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर कर्मचारी व अधिकार्‍यांना अटकपूर्व जामीन घ्यावा लागला होता. 2016 पासून या प्रकरणी न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com