अर्बन बँक : लिहून द्या, रुपयाही खाल्ला नाही

अर्बन बँक सत्ताधार्‍यांना बचाव कृती समितीचे आव्हान
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेचे संचालक व पदाधिकारी आता जी भाषणे ठोकत आहेत, तेच लेखी स्वरूपात लिहिण्याचे त्यांचे धाडस होत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आम्ही घोटाऴे केले नाही व आम्ही एक रुपयाही खाल्ला नाही, असे रिझर्व्ह बँकेला लेखी लिहून द्यावे, असे आव्हान नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेचे नवे अध्यक्ष अशोक कटारिया व संचालक मंडळ सदस्यांना दिले आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडियात भाष्य केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या 15 सप्टेंबर 2020 च्या नोटिशीचे उत्तरच या संचालकांनी दिले नाही. कारण, भाषण करणे आणि लेखी देणे यात फरक असतो, असा दावाही गांधी यांनी केला आहे.

नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी कटारिया यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानंतर पारनेरचे आ. निलेश लंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना आ. लंकेंसह कटारिया व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी बँक बचाव कृती समितीवर टीका केली होती. या समितीने निवडणुकीत पळपुटेपणा केला. तसेच त्यांचे भाष्य फक्त फेसबुकवर असते, अशा आशयाच्या या टीकेला माजी संचालक गांधी यांनी उत्तर दिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नोटिशीला संचालकांनी त्यावेळी उत्तर देण्याचे टाळल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने 6 डिसेंबर 2021 रोजी नगर अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लावले व ही सत्य परिस्थिती कितीही खोटी भाषणे केली तरी बदलणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या 15 सप्टेंबर 2020 च्या नोटिशीचे उत्तर देणे का टाळले, याचे उत्तर एकही संचालक देवू शकणार नाही, असा दावाही गांधी यांनी केला आहे.

आता भाषणांची वेळ नाही. नगर अर्बन बँकेचे पदाधिकारी, संचालक व बालिश नेते यांनी खोटे बोलणे बंद करून बँकेच्या थकबाकी वसुलीवर भर देणे महत्वाचे असून आम्ही घोटाळे केले नाही, आम्ही सर्व कर्जे नियमानुसार दिली, आम्ही कोणाचे एक रुपयाला लाजिणदार नाही, विरोधक खोटे बोलतात...अशी भाषणे देण्याची आताची वेळ आहे का, असा सवाल करून गांधी म्हणाले, निवडणुकीच्या वेळी ही भाषणे ठीक होती. पण, अजूनही अशी भाषणे का केली जातात याचे कारण स्पष्ट आहे की, वसुलीमध्ये येत असलेले अपयश किंवा वसुली करण्याच्या प्रामाणिक इच्छेचा अभाव.

नगर अर्बन बँकेत कोणी काय केले आहे, हे आता प्रत्येक सभासदाला माहित पडले आहे. तसेच सर्वात महत्त्वाची संस्था भारतीय रिझर्व्ह बँकेला देखील माहीत आहे व रिझर्व्ह बँकेने 15 सप्टेंबर 2020 च्या नोटीसीत याचा सर्व उल्लेख करून बँकेच्या सर्व 18 संचालकांनायाबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. पण दोन वर्षात संचालकांनी उत्तरच दिले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने एकतर्फी कारवाई करून टाकली. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या. आता यामधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे सक्तीची वसुलीचा. पण संचालक मंडळ हेच नेमके करीत नाही व नियमित कर्जदारांनी स्वतः इच्छेने भरलेले 125 कोटी रुपये आम्ही वसूल केले असा खोटा डांगोरा पिटण्याची लाजिरवाणी वेळ संचालक व त्यांच्या बालिश नेत्यावर आली आहे, असा दावाही गांधी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com