नगर अर्बन बँक : सभासद, खातेदारांची दिशाभूल थांबवा

वसुलीसह केलेल्या कायदेशीर कारवाई माहिती देण्याची चोपडा यांची मागणी
नगर अर्बन बँक : सभासद, खातेदारांची दिशाभूल थांबवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेवरील निर्बंध आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मधल्या काळात संचालक मंडळाने बँकेची चांगली वसुली सुरू असल्याचा दावा करत लवकरच बँक निर्बंध मुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, संचालक मंडळाचा हा दावा संशयास्पद असल्याचा आरोप बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केला आहे. बँकेचे नूतन चेअरमन अशोक कटारिया यांना दिलेल्या पत्रात थकबाकी वसुलीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होत नसल्याचे सांगत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

चोपडा यांनी पत्रात म्हटले आहे, बँकेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बँकेवर रिझर्व्ह बँकेची बंधने आहेत आणि वसुली झाली नाही. यामुळे बँकेची परवानगी रद्द होण्याची देखील टांगती तलवार बँकेवर असतानाही कोणत्याहीप्रकारे कडक पध्दतीने वसुलीकडे आणि बँकेच्या हिताकडे लक्ष न दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने नुकतेच बँकेवरील निर्बंध पुढे अजून 3 महिन्यांसाठी वाढविलेले आहेत. बँकेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी अत्यंत विश्वासाने बँकेचा कारभार सोपविला. परंतु चेअरमन म्हणून तुमचे कामकाज व पध्दती पाहून पूर्णतः भ्रमनिरास झाला आहे.

बँकेमध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये चेअरमन होण्यासाठी कशा प्रकारची गटबाजी झालेली आहे, याबाबतची देखील चर्चा सर्वत्र चालू आहे. नियमबाह्य व टोलवाटोलवीच्या कामकाजामुळेच बँकेवर निर्बंधांची मुदत पुनश्च वाढविण्यात आली आहे, असा आक्षेप आहे. त्यातच 8 महिन्यांत 3 संचालकांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. ठेवीदाराचे किती पैसे देणे बाकी आहे? बँकेचा सीडी रेशो किती आहे? बँकेचा आज सीआरआर किती आहे? बँकेचा खरा एनपीए किती आहे? बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्टचे सेक्शन 13(4) प्रमाणे किती नोटिसा दिल्या आहेत? नोटिसा दिल्यानंतर किती लोकांवर कारवाई केली आहे? किती लोकांच्या तारण मालमत्ता सील करून त्यांची विक्री करणेसाठी कायदेशीर प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.

ती राबवली आहे का? याची माहिती बँकेच्या लेटरपॅडवर वा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने देण्यात यावी. बँकेचे सर्वात मोठे कर्ज घेणारे जे टॉप 50 कर्जदार व्यक्ती किंवा फर्म आहेत, त्यांच्याकडील आत्तापर्यंत असलेल्या थकबाकीची रक्कम किती झालेली आहे, त्यांची प्रिन्सीपल अमाउंट किती आहे व त्यापैकी वसूल किती झालेली आहे याचा तपशील मिळावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com