निवडणूक बिनविरोध करा

दोन कोटी खर्च वाचेल
निवडणूक बिनविरोध करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या झालेल्या बिकट अवस्थेचा विचार करता बँकेच्या भवितव्यासाठी होणारी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी वसंत लोढा यांनी केली आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास बँकेच्या दीड-दोन कोटींचा खर्च वाचेल, असेही ते म्हणाले.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. निवडणूक झाली तर बँकेवर दीड ते दोन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच संकटात असलेली बँक अधिक अडचणीत येणार आहे बँकेच्या हितासाठी सर्वांनी समुपचाराने विचार करून अपासातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.

अर्ज मागे घेण्यास अजून दोन दिवस बाकी आहेत. जर निवडणूक बिनविरोध होत असेल तर मी स्वतः पुढाकार घेत माझी पत्नी लता लोढा यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. माजी संचालकांच्या कारभारामुळे बँकेच्या एनपीएमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोणामुळे बँकेवर प्रशासक आला, बँकेचा कारभार करताना त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या, त्याबाबत होणारे आरोप प्रत्यारोप सध्या बाजूला ठेवणे आवश्यक आहे. न्यायालयात या बाबत निर्णय होणारच आहे. भविष्यात जर बँक बंद झाली तर शेकडो कर्मचार्‍यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कर्मचारीवर्ग ही या निवडणुकीच्या विरोधात आहेत.

नगर अर्बन बँक ही सर्वसामान्य जनतेची कामधेनू आहे. त्यामुळे या बँकेला आपल्याला वाचवायचे आहे. आधीच तोट्यात असलेल्या बँकेला पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आणायचे असल्याने दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी एकत्र येवून चर्चा करून दोन दिवसात निर्णय घ्यावा, असे आवाहन लोढा यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com