अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेबाबत चार गुन्हे पोलीसात दाखल झाले असतानाही पोलिसांकडून या गुन्ह्यांच्या तपासाबाबत फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. त्यामुळे नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच कर्जत येथील ठेवीदारांनी येत्या 26 जानेवारी रोजीपोलिसांच्याविरोधात जाहीर केलेल्या धरणे आंदोेलनासही नगर अर्बन बँक बचाव कृतीसमितीने पाठिंबा दिला आहे तसेच या आंदोलनात सक्रीय सहभागाचे सूतोवाच केलेआहे.
बँकेच्या संदर्भात पिंपरी-चिंचवड शाखेत झालेला 22 कोटीचा चुकीचे कर्ज वितरण घोटाळा, नगरच्या मुख्य शाखेत झालेला सुमारे 3 कोटीचा चिल्लर घोटाळा, शेवगाव शाखेत झालेला सुमारे 5 कोटीचा बनावट सोनेतारण कर्ज घोटाळा व सुमारे 28 कर्ज खात्यांमध्ये चुकीचे कर्ज वितरण करून दीडशे कोटीचा घोटाळा झाल्याची चार प्रकरणे पोलीसात दाखल आहेत. या चारही प्रकरणांचा पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्याने तपास केला.
पण आता पोलिस यंत्रणेने हा तपास बासनात गुंडाळून ठेवल्याची स्थिती आहे. दीडशे कोटीच्या 28 कर्ज प्रकरणांचा तपास करताना यातील बनावट कर्ज प्रकरणांची व्याप्ती वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अर्बन बँकेच्या सर्वच कर्ज वितरणाच ेफॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे व यासाठी स्वतंत्र संस्थाही नेमली आहे. पण या ऑडीटचाही तपास फारसा प्रगतीच्या दिशेने नसल्याने अखेर बँक बचाव कृती समितीने पोलिसांविरोधात भूमिका घेण्याचे सूतोवाच केले आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पदच..
यासंदर्भात माजी संचालक गांधी यांनी सांगितले की, नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांबाबत पोलीसात दाखल फौजदारी गुन्ह्यांच्याबाबतीत पोलिसांची भूमिका संशयास्पदच आहे. बँकेत झालेल्या सव्वा तीन कोटीच्या चिल्लर घोटाळ्यात फक्त कर्मचार्यांना अटक झाली आहे व यातील इतर आरोपींना अटकपूर्व जामीन घेईपर्यंत पोलिसांनी मोकळीक दिली आहे. पिंपरी-चिंचवड शाख़ेतील 22 कोटी फसवणूक प्रकरणी फक्त नवनीत सुरपुरिया या एकाच संचालकाला काही महिने अटक झाली होती. यातील दोषी बाकीच्या संचालकांना अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत त्यांना पोलिसांनी मोकळीक दिली. तसेच करोनाची पार्श्वभूमीवर आणि वय खोटेव वाढवून दाखवून अटकपूर्व जामीन मिळवले असून, पोलिसांकडून त्याकडे डोळेझाक केली गेली आहे. शेवगाव शाखेत घडलेल्या सुमारे सव्वा पाच कोटीच्या बनावट सोनेतारण प्रकरणात फक्त गोल्ड व्हॅल्युअरला अटक झाली आहे. या घोटाळ्याची पूर्वकल्पना असताना संचालकांनी त्याकडे डोळे झाककेल्याबद्दल संचालकांवर पोलिसांकडून काहीच कारवाई झालेली नाही, असा गांधी यांनी केला आहे.