‘अर्बन’चा गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर गजाआड

‘अर्बन’चा गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर गजाआड

शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला आज (शनिवार) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ए. आर. आव्हाड करीत आहेत.

शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट सोनेतारण ठेवून बँकेची सुमारे पाच कोटी 30 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. मुख्य आरोपी दहिवाळकर याला अटक केल्याने तपासाला गती येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.

2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा देऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले होते.

मागील चार वर्षांच्या कालावधीत 159 कर्जदारांनी 364 पिशव्यांत 27 किलो 351.10 ग्रॅम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे पाच कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याच्यासह 159 कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com