संचालक, अधिकार्‍यांच्या संपत्तीची माहिती मागवली

नगर अर्बन बँक फसवणूक प्रकरण
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेचे 2013 पासून ते आतापर्यंतचे संचालक व त्यांच्या कुटुंबियांसह बँकेच्या वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांकडील संपत्तीची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे मागितली आहे. अर्थात महिनाभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे ही माहिती मागितली होती, पण अजूनपर्यंत ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली नसल्याचे समजते. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून बँकेच्या 2014 ते 2019 या काळातील संचालक व अधिकार्‍यांविरूध्द सुमारे 150 कोटींचे चुकीचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.

बँकेच्या कर्ज खात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट सुरू आहे. बँकेकडून काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 91 प्रमाणे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. बँकेला महिनाभरापूर्वी आलेली नोटीस व त्याद्वारे संचालक आणि अधिकार्‍यांच्या संपत्तीची पोलिसांनी सुरू केलेली खानेसुमारी स्पष्ट झाल्याने शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

पोलिसांच्या या नोटिसीद्वारे किती संचालक व अधिकार्‍यांची सविस्तर माहिती बँकेच्या प्रशासनाने पोलिसांना दिली, हे अजून स्पष्ट झाले नसले तरी ज्या अर्थी काहीजण याबाबत अजूनही सल्ले घेत असल्याने माहिती संकलनाची ही प्रक्रिया अजून सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, यातून बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात संचालक व अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार दिसू लागली आहे व यातून त्यांचे कुटुंबीयही सुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com