अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सहा महिन्यांपूर्वी हक्काच्या पैशांसाठी उपोषण आंदोलन करूनही खात्यात पडून असलेले लाखो रुपये परत दिले जात नसल्याने नगर अर्बन बँकेच्या खातेदारांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजल्यापासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा खातेदार महेश जेवरे, जयदीप तापकीर व रमेश तापकीर यांनी दिला आहे. तसे निवेदनही त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिले आहे.
जेवरे यांच्या नगर अर्बन बँकेच्या कर्जत येथील शाखेत असलेल्या करंट खात्यात 31 लाख 6 हजार 244 रुपये आहेत. जयदीप तापकीर यांचे व त्यांचे वडील राम तापकीर यांच्या कर्जत शाखेतीलच चालू खात्यात 9 लाख 50 हजार रुपये आहेत व रमेश तापकीर यांचे 7 लाख 70 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. हे पैसे परत मिळावेत म्हणून मागील दीड-दोन वर्षांपासून त्यांचा बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
पण बँकेच्या सत्ताधार्यांद्वारे हे पैसे दिले जात नाही, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांचे कारण असल्याचे सांगितले जाते. पण खात्यातील हक्काचे पैस ेमिळत नसल्याने मुलांचे शिक्षण व लग्न कार्यासाठी तसेच शेती व अन्य कामांसाठी बाहेरून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत म्हणून त्यांनी येत्या 26 जानेवारीला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संचालकांनी फसवणूक केल्याचा आरोप
जेवरे तसेच जयदीप तापकीर व रमेश तापकीर यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने फसवणूक करून अडकवलेल्या ठेवी परत मिळण्याची मागणी केली असून, यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निवेदनात म्हटले आहे, नगर अर्बन बँकेवर भ्रष्टाचारामुळे रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्याने बँकेचे सर्व व्यवहार बंद झाले आहेत. आम्ही ठेवीदारांनी अनेकवेळा विनंती करूनही आमच्या ठेवी अद्याप मिळत नाहीत. भ्रष्टाचार ज्या संचालकांनी केला, तेच सध्या सत्तेवर असल्याने तसेच चुकीचे कर्ज दिलेल्या व संचालकांनीच भ्रष्टाचार केल्याने ते वसूल करीत नाहीत. या संचालकांवर पोलिसांकडे केसेस दाखल आहेत. पण पोलिसांकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने बँकेचे संचालक वसुली जाणून बुजून करीत नाहीत.जे थकीत कर्जदार आहेत, ते बँकेच्यादृष्टीने गुन्हेगारच आहेत. या कर्जदारांकडे वसुलीकरता बँक त्यांच्याकडे गेली असता, ते असे सांगतात की, कर्जाचे पैसे आम्हाला मिळाले नाही, ते तत्कालीन संचालकांनी परस्पर घेतले आणि संचालक म्हणतात, कर्जदार पैसे भरत नाहीत. याचा अर्थ असा की, दोघांवरही कारवाई झाली तरच सत्यबाहेर येणार आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी फक्त आश्वासन
मागील वर्षीच्या 5 जुलै 2022 रोजी नगर अर्बन बँकेच्या नगरमधील मुख्यालया समोर महेश जेवरे यांच्यासह अरविंद काळोखे, विजय जोशी, सचिन भंडारी, चेनसुख पितळे, सुनील कोठारी, अतुल कोठारी, प्रफुल्ल नेवसे, अशोक सुपेकर, कल्याण काळे, रविकिरण नेवसे आदींसह सुमारे 50 च्यावरखातेदारांनी उपोषण केले होते. नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले असून याला जबाबदार संचालक मंडळ आहे. त्यामुळे या संचालकांनी राजीनामे द्यावेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत व त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करून आणि त्या विकून ठेवीदार व खातेदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. बँक बचाव कृती समितीने यावेळी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी बँकेच्या सत्ताधार्यांनी रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधून खातेदारांचे पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व संचालक अनिल कोठारी, गिरीश लाहोटी, भय्या गंधे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले व आश्वासन दिले. पण सहा महिन्यात त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही व या दरम्यानच्या काळात ज्यांनी आश्वासने दिली, त्यापैकी अग्रवालव गंधे या संचालकांनी पदांचे राजीनामे देऊन ते बँके बाहेर पडले आहेत.त्यामुळे ठेवीदारांनी आता पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे.