नगर अर्बन बँक निवडणूक : चित्र स्पष्ट, तरीही टशन कायम

सत्ताधारी विरोधकांचे एकमेकांवरील आरोपांचे सत्र सुरूच
नगर अर्बन बँक निवडणूक : चित्र स्पष्ट, तरीही टशन कायम

अहमदनगर | प्रतिनिधी

'सहकार'ने पलटी मारली; ‘बँक बचाव'चा आरोप

अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरवातीपासून बँक बचावो समितीच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. शेवटपर्यंत केलेल्या प्रयत्नात आमदार खासदार यांची मध्यस्थी झाली. मात्र सहकार पॅनलने प्रतिसाद दिला नाही. उलट पलटी मारली, असा आरोप करून बँकेचे हित डोळ्यासमोर ठेवत बँक बचावो समितीच्या सर्व २२ उमेदवारांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतल्याचे बँक बचावो समितीने म्हटले आहे.

बँकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी बँक बचावो समितीच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत समितीचे नेते वसंत लोढा, राजेंद्र गांधी, संजय छल्लारे, दीप चव्हाण आदींनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी अभय आगरकर, सदा देवगावकर, अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, उमेश गिल्डा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना समितीचे नेते वसंत लोढा म्हणाले, तत्कालीन सत्ताधारींनी केलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आमच्या कडे आहेत. जर निवडणूक झाली असती तर बँकेवर मोठ्याप्रमाणात आरोप झाले असते. त्यातून बँक अधिक बदनाम झाली असती. अर्बन बँक ही सर्वसामान्यांची कामधेनु आहे. ११० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेली ही बँक आम्हाला वाचवायची होती. निवडणुकीचा बोजा बँकेवर पडू नये म्हणून आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आहे.

राजेंद्र गांधी म्हणाले, बँकेची आर्थिक स्थिती खराब असताना आम्ही बिनविरोध निवडणुकीसाठी मोठे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. सभासदांनाच निवडणूक नको होती. निवडणूक झालीच तर ती बिनविरोध हवी होती. सभासदांच्या या भावनेचा आदर करत बँक बचाव समितीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन अर्ज माघारी घेतले. समोरच्यांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. अटकपूर्व जामिनावर बाहेर असलेले व निवडणूक लढविण्यास अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर असलेले बरखास्त संचालक मंडळातील सर्व सदस्य स्वतः समजून घेवून थांबतील व बँक बचाव समितिच्या सदस्यांना काम करण्याची संधी देतील अशी एक आशा होती. बिकट अवस्थेतील बँकेला संकटातून बाहेर काढू असे सकारात्मक वाटत होते. बँकेची बिकट आर्थिक परिस्थितित बँकेला दोन ते अडीच कोटीचा फटका नको म्हणून खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर झालेल्या बैठकीतून ५० टक्केचा फॉर्मूला चर्चेत आला. या ५० टक्क्यांत फौजदारी गुन्ह्यातील आरोपी व अपात्रतेची टांगती तलवार असलेले संचालक असतील तर भविष्यात ते तापदायक ठरेल व बँकेला दोन वेळेस निवडणूक करावी लागण्याचा धोका होवू शकतो, म्हणून या संचालकांना वगळून नावे असावीत, असे बँक बचाव समितीचे म्हणने होते. परंतु ऐन अर्ज माघारीचे दिवशी शेवटच्या क्षणी बरखास्त संचालकांनी पलटी मारली व आम्ही बँक बचाव समितीला फक्त सहा जागा देवू असा प्रस्ताव ठेवण्यात आला हा प्रस्ताव मंजूर होणेसारखाच नव्हता व अटी शर्ती वरची भीक नको या स्वाभिमानी विचारसरणीतून व सभासदांना निवडणूक बिनविरोध करणेचे शब्दाचे पालन करण्याच्या भूमिकेतून बँक बचाव समितीचे १७ उमेदवार व सोबत ५ जास्तीचे उमेदवार अशा २२ जणांने एकाच वेळी उमेदवारी अर्ज काढून घेतले. बँक बचाव पॅनेलने केलेल्या त्यागावर पाणी फिरले. याच्या मनस्वी वेदना होत आहेत. बँक बचाव समितीने प्रामाणिक भावनेने निवडणुकीतून माघार घेतली असली तरी बँकेचे कारभारावर बारकाईने लक्ष ठेवणेचे काम बँक बचाव समिति यापूढे पण करणार आहे व न्यायालयीन लढाई व फौजदारी गुन्हेचे पाठपुरावेतून बँकेची वसूलीवर भर देणारच आहे. यावेळी संजय छाल्लारे, दीप चव्हाण यांनीही भूमिका व्यक्त केली.

वाळू सरकल्यानेच माघार; सहकार पॅनलचा दावा

स्व. दिलीप गांधींनी आयुष्यभर बँकेच्या उन्नतीसाठी काम केले. त्यामुळे सभासद आमच्या पाठीशी नेहमी होते. विरोधकांनी व्यक्ती द्वेषातून चुकीचे आरोप केले, मात्र सभासदांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांच्या पाया खालची वाळू सरकली होती. त्यामुळेच त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की आली आहे. आता आमचे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत, येत्या दोन-चार दिवसानंतर सर्व पॅनल बिनविरोध होईल असा विश्वास सहकार पॅनलने व्यक्त केला आहे.

काल अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दिवसभर नाट्यमय घटना घटत विरोधी सर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सहकर पॅनलचे चार उमेदवार सायंकाळी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे सुवेंद्र गांधीच्या नेतृत्वा खालील सहकर पॅनलच्या सर्व उमेदवारांनी व समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत रात्री स्व. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी सुवेंद्र गांधी यांना खांद्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गुलालाची उधळण करत ढोल-ताशाच्या गजरात स्व. दिलीप गांधी यांचा फोटो डोक्यावर घेत व सुवेंद्र यांना खांद्यावर घेत समर्थकांनी जल्लोष केला.

यावेळी बोलताना सहकार पॅनलचे सुवेंद्र गांधी म्हणाले, बँक निवडणुकीच्या रणनितीसाठी खा. सुजय विखे यांचे मार्गदर्शन मिळाले, अनेक इतर पक्षातील नेत्यांनी मदत केली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी येवून गांधी कुटुंबाला दिलेला आधार व पाठिंबा यामुळे मिळत असलेला हा विजय स्व. दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली आहे. कायम सत्याचाच विजय होत असतो, त्यामुळेच बँकेच्या इतिहासात प्रथमच असा चमत्कार घडला आहे. आता नव्या उत्साहात अधिक काम करत बँक पाच हजार कोटींची करण्याचे स्व. दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे वर्चस्व -असलेली नगर अर्बन बँकेत त्यांच्या पश्चातही युवा नेते सुवेंद्र गांधी यांनी सहकार पॅनलची धुरा सांभाळत नेतृत्व सिद्ध केले आहे. यावेळी श्रीमती सरोज गांधी या स्व. दिलीप गांधी यांच्या फोटोला गंध लावतांना त्यांच्यासह अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. दिलीप गांधीच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बिनविरोध निवडून आलेले दिनेश कटारिया, संगीता गांधी, मनीषा कोठारी व मनेश साठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार पॅनलचे उमेदवार अशोक कटारिया, दीप्ती गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, राजेंद्र अग्रवाल, अजय बोरा, महेंद्र गंधे, संपत बोरा, गिरीष लाहोटी, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, अतुल कासट, कमलेश गांधी, सचिन देसर्डा आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com