14 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात

14 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात

नगर अर्बन बँक: बँक बचाव समितीची माघार, सहकार पॅनलचे वर्चस्व

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाची आर्थिक संस्था असलेल्या नगर अर्बन बँकेच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, 14 जागांसाठी निवडणूक लागली असून त्यासाठी 21 उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या आखाड्यातून बँक बचाव समितीने माघार घेतल्याने बँकेवर सहकार पॅनलची (गांधी गट) सत्ता येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 87 जणांचे अर्ज शिल्लक होते. त्यातील बँक बचाव कृती समितीच्या 22 जणांसह 66 जणांनी निवडणूकीतून माघार घेतली. यामुळे सहकार पॅनलच्या (गांधी गट) चार जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये मनपा व भिंगार कॅन्टोमेंट हद्दीतील रहिवासी मतदार संघ (महिला) संगीता दिपक गांधी, मनेष दशरथ साठे (अनु.जाती, अनु. जमाती), मनपा व भिंगार कॅन्टोमेंट हद्दीतील कार्यक्षेत्र वगळून महाराष्ट्र राज्य मतदार संघ (महिला) मनिषा रवींद्र कोठारी, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रा बाहेरील उर्वरीत कार्यक्षेत्र मतदार संघ दिनेश पोपटलाल कटारिया यांचा प्रत्येकी एक अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवासी मतदार संघ (सर्वसाधारण) 10 जागांसाठी 14 उमेदवार आणि मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील कार्यक्षेत्र वगळून महाराष्ट्र राज्य मतदार संघ (सर्वसाधारण) 4 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात राहिल्याने या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

मनपा हद्दीतील मतदार संघ (सर्वसाधरण) 10 जागेसाठी ईश्वर अशोक बोरा, अनिल चंदुलाल कोठारी, संपतलाल धनराज बोरा, राहुल नरेंद्र जामगांवकर, राजेंद्रकुमार अत्माराम अग्रवाल, स्मिता महावीर पोखरणा, अनिल पांडूरंंग गट्टाणी, शैलेश सुरेश मुनोत, गिरीश केदारनाथ लाहोटी, दिप्ती सुवेंद्र गांधी, महेंद्र मोहिनीराज गंधे, अजय अमृतलाल बोरा, संजय शिवाजी डापसे, दीपक धनराज गुंदेचा यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत.

मनपा हद्दीतील कार्यक्षेत्र वगळुन राज्य मतदार संघ (सर्वसाधरण) चार जागेसाठी कमलेश हस्तीमल गांधी, अशोक माधवलाल कटारीया, रमणलाल प्रेमराजजी भंडारी, अतुल राधावल्लभ कासट, गणेश श्यामसुंदर राठी, सचिन मदनलाल देसर्डा, रज्जाक निजाम इनामदार यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत.

...म्हणून बँक बचाव समितीची माघार

बँक बचाव समितीने निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने बँकेवर सहकार पॅनलची (गांधी गट) सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूकीतून माघारीबाबत बचाव समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्र परिषदेत भूमिका मांडली. आम्ही बिनविरोध निवडणुकीसाठी मोठे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही, सत्ताधार्‍यांवर बँकेत गैरमार्गाने झालेले व्यवहार, कर्ज प्रकरणे झाले असल्याने बँकेची आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत आरबीआय कडून कारवाई संभाव्य आहे. संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक लादली गेली. त्यामुळे सभासदांनाच मुळात निवडणूक नको होती आणि झालीस तर ती बिनविरोध व्हावी असे सभासदांची भावना होती. सभासदांच्या या भावनेचा आदर करत बँक बचाव समितीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र बँकेत झालेल्या गैर कारभाराबद्दलचा पाठपुरावा माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या माध्यमातून बँक बचाव समिती यापुढेही सुरू ठेवेल असे सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी, संजय छल्लारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

माघारीच्यावेळी गोंधळ, धक्काबुक्की

उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटा दिवस असल्याने तीन वाजेपर्यंत माघारीसाठी मुदत होती. यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन नंतर अर्ज माघारी घेण्यास विरोध दर्शविला. अर्ज माघारीबाबत सहकार पॅनल व बँक बचाव समितीचे एकमत झाल्याने विरोध होत असल्याचे पाहून काही उमेदवारांनी त्या सामाजिक कार्यकर्त्याला धक्काबुक्की केली. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यापर्यंत वाद आला नसल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com