सकारात्मक बोलणीसाठी तयार

कोठारी । काहींच्या महत्वाकांक्षेमुळे बिनविरोधला खोडा
सकारात्मक बोलणीसाठी तयार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत काहींची अतिमहत्वाकांक्षा आडवी आली व बोलणी फिसकटली याचे आम्हास दुःख आहे, असे ज्येष्ठ संचालक अनिल कोठारी यांनी म्हटले आहे. एकीकडे बिनविरोधची बोलणी करायची अन दुसरीकडे हरकत घ्यायची हे योग्य नाही. या स्थितीतही बँक व कर्मचार्‍यांचे हित सर्वतोपरी असून त्यासाठी सन्मानजनक व सकारात्मक बोलणीसाठी तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

नगर अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रीया सुरू आहे. सत्ताधारी व विरोधी गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. प्रचाराच्या निमित्ताने एकमेकांवर शरसंधान साधले जात आहे. बँक निवडणूक बिनविरोध व्हावी, असाही एक सूर होता. मात्र आता दोन पॅनल रिंगणात उतरल्याने ही शक्यता धूसर झाली आहे. मात्र सत्ताधारी गटाचे अनिल कोठारी यांनी बिनविरोधची आशा जीवंत असल्याचे संकेत दिले आहेत. बँक निवडणुकीबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे ही बाब समोर आली आहे.

कोठारी म्हणाले, महिन्याभरापासून मी व माझे सहकारी अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो. परंतु त्यास यश मिळत नसल्याने निवडणुकीस सामोरे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. शहरासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय नेते यांनीही यात सहकार्य दिले. बँकेचे माजी चेअरमन, वकील व बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नावावर आमची सहमती झाली होती. मात्र काही व्यक्तींचा महत्वकांक्षीपणा आडवा आला व बोलणी फिसकटली. त्याचे आम्हास दुःख आहे. त्यानंतर देखील पुन्हा नवनवीन प्रस्तावांवर चर्चा सुरु होती. सकारात्मक चर्चा सुरु असताना विरोधी गटातील काही उमेदवारांनी विद्यमान संचालकांवर हरकत घेतली आणि तेथेच मिठाचा खडा पडला. एकीकडे बिनविरोधची बोलणी करायची अन दुसरीकडे हरकत घ्यायची हे योग्य नाही.

बँकेत यापूर्वी काय झाले यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आमच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी ते अजून सिद्ध झालेले नाही. तदपूर्वीच विरोधक आम्हास गुन्हेगार ठरवू इच्छित आहे हे योग्य नाही. याच न्यायाने त्यांच्यावरही अर्बन बँकेतील एका व्यवहारात गुन्हे दाखल आहेत. बँक, बँकेचे कर्मचारी यांच्या भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यांच्यातील काही कर्मचारी प्रतिनिधीं सोबतही आमचे बोलणे झालेले आहे, असे कोठारी म्हणाले.

‘ते’ गोत्यात येतील...

बँक कर्मचार्‍यांच्या व्हॉट्सअप ग्रूपमध्ये विरोधकातील काही उमेदवार सहभागी असून विविध पोस्ट करत असतात. त्यामुळे आचारसंहितेचा प्रश्न निर्माण होऊन कर्मचारी गोत्यात येतील याचे भान त्यांनी ठेवावे. आमच्यासाठी बँक व कर्मचार्‍यांचे हित सर्वतोपरी असून त्यासाठी सन्मानजनक व सकारात्मक बोलणीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे कोठारी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com