नगर अर्बन बँक : ठेवीदार व्यापार्‍यांना अध्यक्ष, संचालक घेवून जाणार रिझर्व्ह बँकेकडे

बचाव कृती समितीचे प्रमुख गांधी यांच्यासह चोपडा यांनाही नेणार
नगर अर्बन बँक : ठेवीदार व्यापार्‍यांना अध्यक्ष, संचालक घेवून जाणार रिझर्व्ह बँकेकडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकीकडे पोलिसी चौकशा व दुसरीकडे संचालक मंडळातील वाद यामुळे बदनामीच्या शिखरावर पोहोचलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या विद्यमान सत्ताधार्‍यांना आता उपरती सुचली आहे. कर्जतच्या व्यावसायिकांनी हक्काच्या पैशांसाठी बँकेसमोर उपोषण केल्यावर त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना घेऊन रिझर्व्ह बँकेत जाण्याची ग्वाही बँकेचे संचालक व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांच्या सूचनेनुसार दिली आहे व विशेष म्हणजे या शिष्टमंडळात नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी आणि ज्येष्ठ संचालक राजेंद्र चोपडा यांनाही नेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत. सात महिन्यांपासून लावलेल्या यानिर्बंधांमुळे अनेकांचे बँक खात्याचे व्यवहार बंद झाले. सामान्य खातेदारांना यामुळे अडचणी आल्या, पण व्यापार्‍यांचे व्यावसायिक नुकसान जास्त झाले आहे व अजूनही होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथील महेश जेवरे व स्वप्निल पितळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेसमोेर दोन दिवस उपोषण आंदोलन केले गेले. ते सोडवण्यासाठी याअ ांदोलकांची बँकेचे संचालक गंधे यांनी भेट घेतली व रिझर्व्ह बँकेकडे मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. रिझर्व्ह बँकेकडे भेटीची वेळ मागितली जाईल व त्यांनी दिलेली वेळ आंदोलकांना कळवली जाईल व त्यांच्यासह रिझर्व्ह बँकेत जाऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचेआश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

नावे पाहून आश्चर्य

कर्जतच्या आंदोलकांना लेखी आश्वासन बँकेच्या प्रमुख व्यवस्थापकांनी दिले असले तरी त्यातील नावे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. कर्जतच्या व्यापार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्यासाठी तसेच ठेवीदारांच्या रकमा त्यांना परत देण्याची परवानगी मिळण्यासाठी नेण्यात येणार्‍या शिष्टमंडळात अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, संचालक भय्या गंधे, अनिल कोठारी, अशोक कटारिया, शैलेशमुनोत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार रोकडे, सभासद सुवेंद्र गांधी,राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा आणि उपोषण करणार्‍या ठेवीदार-खातेदारांचे प्रतिनिधी म्हणून महेश जेवरे व स्वप्निल पितळे यांचा समावेश असल्याचे बँकेने लेखी जाहीर केले आहे. बँकेच्या प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनातील राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा या दोन नावांना संचालकांनी पसंती कशी दिली, हाच यानिमित्ताने कळीचा व चर्चेचा मुद्दा झाला आहे. या दोघांना बँकेचे पदाधिकारी त्यांचे विरोधक समजतात. बँकेची बदनामी या दोघांमुळेच होेते, असा दावाही केला जातोे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेकडे नेल्या जाणार्‍या शिष्टमंडळात या दोेघांचा समावेश होणे आश्चर्यकारक मानले जात आहे..

त्या आरोपाची होणार तक्रार

कर्जतच्या व्यापार्‍यांचे उपोषण सुरू असताना तेथे बँकेचे अध्यक्ष अग्रवाल व संचालक गिरीश लाहोटी यांच्यात माईकवर जाहीर वादावादी झाली. बँकेचे चेअरमन निष्क्रीय आहेत, असा आरोप लाहोटींनी केला तर अध्यक्ष अग्रवाल यांनी संचालक लाहोटींचे वडील केदार लाहोटी यांचे नाव घेऊन त्यांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर, अर्बन बँक बचाव कृती समितीने याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे चेअरमन अग्रवाल यांनी केलेल्या या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात येणार आहे. एककोटी रुपये ही रक्कम लहान नाही व ज्यावेळी एक जबाबदार व्यक्ती जाहीरपणे बोलते, त्यावेळी तो विषय गंभीर असला पाहिजे व हे पैसे ठेवीदारांचे कष्टाचे आहेत. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे, असे बचाव कृती समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com