नगर अर्बनचे अध्यक्ष अग्रवालांचा राजीनामा

वादावादीमुळे घेतला निर्णय
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा व बँकेच्या संचालक पदाचाही तडकाफडकी राजीनामा दिला. बँकेतील सत्ताबाह्य केंद्राशी झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अनेक अडचणींचा सामना करताना अस्तित्वही धोक्यात आलेल्या नगर अर्बन बँकेच्यादृष्टीने अध्यक्ष अग्रवाल यांचा राजीनामा धक्कादायक मानला जात आहे. सोशल मीडियातून यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्य संगीता गांधी यांनी याआधीच संचालकपदाचा राजीनामा दिला आहे व आता अग्रवाल यांनीही संचालकपद सोडल्याने बँकेच्या संचालकांमध्ये फूट पडली आहे.

नगर अर्बन बँकेतील चुकीचे कर्ज वाटप व गैरव्यवहार यामुळे सहा गुन्हे दाखल आहेत. यापैकी काही गुन्ह्यांची न्यायालयीन सुनावणीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात बँकेचे कर्जतचे खातेदार बँकेसमोर उपोषणास बसले होते. रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने या खातेदारांना त्यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नसल्याने हे निर्बंध उठवाव,े अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनास बँकेचे संचालक गिरीश लाहोटी यांनी पाठिंबा देताना, बँकेचे अध्यक्ष अग्रवाल यांच्यावर निष्क्रीयतेचा तसेच त्यांच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला होता.

संचालक मंडळाची बैठकच ते घेत नाहीत, थकबाकी वसुलीही करीत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे होते. त्याला अध्यक्ष अग्रवाल यांनी लगेच उत्तर दिले होते व मागील सात महिन्यांत 120 कोटींची वसुली केल्याचे सांगताना संचालक गिरीश लाहोटी यांचे वडील केदार लाहोटी यांनी कर्ज सेटलमेंटसाठी 1 कोटी घेतल्याचे व जालन्याच्या कर्जदाराकडून त्यांच्या खात्यात 1 कोटी आल्याचा दावा केला होता.

गिरीश लाहोटींनी त्याला आक्षेप घेताना, या आरोपांचे पुरावे देण्याचे नाही तर अध्यक्षपद सोडण्याचे आव्हान त्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी बँकेमध्ये अग्रवाल यांच्यासह माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यात या विषयावरून जोरदार खडाजंगी झाली व त्याचवेळी अग्रवाल यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा व संचालक पदाचा राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकल्याचे सांगितले जाते. अग्रवाल यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बँकेवर मागील नोव्हेंबर 2021 मध्ये नवे संचालक मंडळ सत्तारुढ झाले आहे.

अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची व दीप्ती गांधी यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे 1 डिसेंबर 2021 रोजी हाती घेतल्यावर अवघ्या चार-पाच दिवसांतच रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेच्या कामकाजावर निर्बंध लावले. बँकेची थकबाकी 450 कोटीवर गेल्याने ती आधी वसूल करण्याचे व तोपर्यंत नवे तसेच नवे-जुने कर्ज वितरण बंद केले आहे. खातेदारांनाही सहा महिन्यांतून एकदा 10 हजार रुपये मिळण्याची मुभा आहे. सहा महिन्यांसाठीचे हे निर्बंध आणखी तीन महिने वाढवले गेले आहेत. या निर्बंधांची मुदत अजून दोन महिने बाकी आहे. या सात महिन्यांच्या काळात बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या पाठपुराव्याने डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे 5 लाखाआतील ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये परत मिळाले आहेत.

मात्र, 5 लाखापुढील ठेवीदारांचे पैसे मिळणार की नाही, याचा संभ्रम आहे. तर दुसरीकडे बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांनी दगड खाणी व शेत जमिनीवर नगर अर्बन बँकेने नियमबाह्य कर्ज दिले असल्याने या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून वसुली करण्याचे आवाहन केले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अग्रवाल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आधीच अडचणीत असलेली ही बँक आणखी अडचणीत आल्याचे मानले जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com