ऑडिटरच्या उपस्थितीत होणार 15 कोटींचे वाटप

नगर अर्बन : खातेदारांना दिलासा
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेमधील खात्यामध्ये अडकून पडलेले पैसे तब्बल 9 महिन्यांनी संबंधित खातेदारांना आज सोमवारपासून (दि.8) मिळणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे साडेअकराशे खातेदारांची ही सुमारे 15 कोटींहून जास्त मोठी रक्कम आहे. पण ही रक्कम संबंधितांना वितरित करताना ऑडिटर समक्ष ही प्रक्रिया करण्याचे बंधन रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला घातले आहे.

दरम्यान, चुकून जमा झालेले पैसे परत देणे म्हणजे अगदी चुकभूल घेणे-देणे या सदरात मोडणारा साधा सोपा व्यवहार आहे. पण तो पूर्ण करताना देखील नगर अर्बन बँकेचे संचालक काहीतरी गडबड करतील व संबंधितांना पैसे देताना टक्केवारीचा हिशोब करतील अशी शंका असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा साधा सोपा व्यवहारही ऑडीटरच्या निगराणी खाली करायला सांगितले आहे, असा दावा नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला आहे. नगर अर्बन बँकेवर 6 डिसेंबर 2021 रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत.

मात्र, या दिवशी वा त्यानंतर बँकेच्या अनेक खातेदारांच्या खात्यावर त्यांच्या व्यावसायिक देण्या-घेण्याचे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे हे पैसे काढता येत नव्हते, वा व्यापारी व्यवहारापोटी कोणाला ऑनलाईनही देता येत नव्हते. मात्र, आता रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध शिथील केले असून 6 डिसेंबर 2021 रोजी वा त्यानंतर ऑनलाईन जमा झालेले पैसे संबंधित खातेदारांना परत करण्यास मुभा दिली आहे. आज सोमवारपासून ही प्रक्रिया सुमारे महिनाभर चालणार आहे.

मात्र, हे पैसे ट्रान्सफर करताना तेथे लेखा परीक्षकाची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. बँकेच्या कारभारावरील हा अविश्वास बँकेच्या सत्ताधार्‍यांनी वा प्रशासनाने फारसा गांभीर्याने घेतला नसला तरी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने मात्र बँकेच्या संचालकांच्या व प्रशासनाच्या हतबलतेवर टीका केली आहे. खातेदारांना पैसे देताना ऑडिटरच्या अनिवार्य उपस्थितीच्या आदेशातून नगर अर्बन बँकेच्या सध्याच्या सत्ताधारी संचालकांच्या तोंडात आणखी एक सणसणीत चपराक रिझर्व्ह बँकेने मारल्याचा दावा करून माजी संचालक गांधी म्हणाले, विद्यमान संचालकांच्या पूर्वीच्या भ्रष्टाचारी कारनाम्यांचा कटू अनुभव, आरोपींशी संगनमत, प्रत्येक गोष्टीत पैसे खाण्याची वृत्ती यामुळे सावध असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून विद्यमान संचालक मंडळाला अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे, असा दावाही गांधी यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com