नगर अर्बनची आकडेवारीच गुलदस्त्यात

पाच महिन्यांपासून प्रतीक्षा || 5 लाखांपुढील ठेवीदार हवालदिल
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन पाच महिने होत आले तरी नगर अर्बन मल्टीस्टेट- शेड्युल्ड बँकेने 31 मार्च 2022 रोजी बँकेची आर्थिक स्थिती काय होती, याची आकडेवारीच जाहीर केलेली नाही. बँकेकडे किती ठेवी शिल्लक आहेत, किती ठेवीदारांचे पैसे परत दिले आहेत, किती थकबाकी आहे व त्यापैकी किती एनपीए आहे, यासह अन्य अनुषंगिकबाबींची माहिती या आकडेवारीतून पुढे येणार असल्याने यातून बँक अडचणीत आहे की सुस्थितीत आहे, हेही स्पष्ट होणार आहे. मात्र, सत्ताधारी आकडेवारीच जाहीर करीत नसल्याने या आकडेवारीत काहीतरी काळेबेरे असावे, असा संशय येथील नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने व्यक्त केला आहे.

दरम्यान,बँकेने पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे दिले असले तरी पाच लाखावर रकमेच्या ठेवी असलेल्यांचे पैसे कधी मिळणार, याची शाश्वती दिसत नसल्याने हे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. याबाबत बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजीसंचालक राजेंद्र गांधी यांचे म्हणणे आहे की, बँकेचे संचालक मंडळ 31 मार्च 2022 ची आर्थिक आकडेवारी जाहीर करीत नाहीत. प्रचंड लपवालपवी सुरू आहे. ज्यांनी बँकेला फसविले आहे, त्यांच्यावर काहीच कायदेशीर कारवाई करत नाही.

बँकेचे उत्पन्न सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नियोजन नाही किंवा या संचालक मंडळाकडे तसे नेतृत्व नाही. कडक व नेटाने वसुली करण्याच्याबाबतीत प्रामाणिकपणाचा जो दरारा लागतो, तो या संचालक मंडळाकडे नाही. पण वसुली झालीच नाही तर डीआयसीजीसीची 300 कोटींच्या पुढची रक्कमव पाच लाखापुढील ठेवीदारांचे 350 कोटी असे एकूण 650 कोटी रुपये कसे परत देणार व त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन काय आहे, हे जाहीर करण्याची या संचालकमंडळाची हिंमत होत नाही किंवा त्यांची तेवढी कुवत नाही व नियत पण नसावी, असा आरोपही गांधी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com