अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यात मंगळवारी झालेल्या सरपंच निवडीच्या निवडणुकांमध्ये काही गावांनी राजकीय उलथापालथ झाली.

दुसरीकडे अनेक ठिकाणी मातब्बरांनी सत्ता राखण्यात यश मिळवल्याचे दिसून आले. गुंडेगाव येथे बाळासाहेब हराळ गटाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये पद्मश्री पोपटराव पवार हे उपसरपंच झाले आहेत.

हिवरेबाजार, बुर्हाणनगर, नवनागपुर, जेऊर, बहिरवाडी, डोंगरगणसह 21 गावात सरपंच बिनविरोध निवडण्यात आले. चास, जेऊर, गुंडेगाव येथे राजकीय उलथापालथ झाल्याने बहुमत असून ही सत्ता गेल्या. जेऊरमध्ये कर्डिले गटाच्या आठ जागा आल्या होत्या, तर विरोधी गट व महाविकास आघाडी मिळवून नऊ जागांवर विजयी झाले होते.

परंतु महाविकास आघाडीचे आठ सदस्य कर्डिले गटात दाखल झाल्याने येथे कर्डीले गटाच्या राजश्री मगर सरपंच बनल्या. आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंचपद महिला राखीव झाल्याने येथे पद्मश्री पवार यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागले. सरपंचपदी विमल ठाणगे यांची बिनविरोध निवड झाली.

झेडपी उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या खारेकर्जुलेत प्रभाकर मगर सरपंच तर अंकूश शेळके उपसरपंचपदी बिनविरोध झाले. वाळूंजमध्ये सरपंचपदी सुखदेव दरेकर तर उपसरपंचपदी अनिल मोरे यांची निवड झाली. गुणवडीत सरपंचपदी रंजना शाम साळवे व उपसरपंचपदी रावसाहेब शेळके यांची निवड झाली. माजी सभापती बाळासाहेब हराळ यांना गुंडेगाव येथील 20 वर्षाच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

याठिकाणी मंगल सकळ सरपंच झाल्या. अपक्ष चिचोंडी पाटीलमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांची सरपंचपदी निवड झाली.निंबळकमध्ये लामखडे यांनी सरपंचपदी सुनबाईनांच मान दिला. नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. खडकीमध्ये सरपंचपदी प्रविण कोठुळे व उपसरपंचपदी सुरेखा गायकवाड निवडून आले.

इमापूरमध्ये सरपंचपदी भीमराज मोकाटे तर उपरसरपंचपदी लक्ष्मी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. दरेवाडीच्या सरपंचपदी स्वाती बेरड तर उपसरपंचपदी अनिल करांडे यांची निवड झाली. ससेवाडीमध्ये सरपंचपदी दत्तात्रय जरे तर उपसरपंचपदी प्रशांत ससे यांची बिनविरोध निवड झाली. डोंगरगणला सरपंचपदी वैशाली मते, उपसरपंचपदी संतोष पटारे यांची निवड झाली. बहिरवाडीला सरपंचपदी अंजना येवले, उपसरपंचपदी मधुकर पाटोळे यांची निवड झाली.

खोसपुरीत सरपंचपदी नशीबाबी पठाण उपसरपंच मीना भालेराव निवडून आल्या. पिंपळगाव माळवीत सरपंचपदी राधिका संजय प्रभुणे यांची निवड झाली. इसळकच्या सरपंचपदी छाया संजय गेरंगे, उपसरपंचपदी शोभा खामकर यांची निवड झाली. पोखर्डीत सरपंचपदी रामेश्वर निमसे तर उपसरपंचपदी अजय कराळे, खंडाळ्यात सरपंचपदी मोहन सुपेकर उपसरपंचपदी दिपाली लोटके यांची निवड झाली.

कामरगावमध्ये तुकाराम कातोरे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तालुक्यातील बहुतांशी नेत्यांनी आपापले गावाची सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले असल्याचे सरपंच निवडीतून दिसून आले आहे.

धनगरवाडी रुईत उपसरपंच कारभारी

धनगरवाडी व रुईछत्तीशीत अनुसूचित जमाती महिला सरपंच पदासाठी आरक्षण पडलेले आहे. परंतु आरक्षणाचा उमेदवारच नसल्याने दोन्ही ठिकाणी सरपंच पदाच्या जागा रिक्तच राहिल्या आहेत. आरक्षणात बदल करण्याची मागणी होत असली तरी आरक्षणात बदल झाला नाही तर उपसरपंचालाच गावचा कारभार पाहावा लागणार आहे.