नगर तालुका व एमआयडीसी लॉकडाऊन करा

पंचायत समिती सभापती गुंड, उपसभापती पवार यांची मागणी
नगर तालुका व एमआयडीसी लॉकडाऊन करा
File Photo

अहमदनगर |तालुका वार्ताहर| Ahmednagar

नगर शहराबरोबर नगर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मुत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शहरात ज्या पध्दतीने कडक लॉकडाऊन केले, तसेच लॉकडाऊन नगर तालुका व एमआयडीसीमध्ये करावे, अशी मागणी पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

नगर शहराप्रमाणेच तालुक्यातील करोना रुग्णांची वाढती मोठ्या संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये माहिती घेतल्यानंतर शासकीय नोंदी शिवाय बाधित रुग्ण कितीतरी अधिकपटीने जादा आहेत. निव्वळ मोठ्या गावांचा विचार केला तरी त्याठिकाणी 200 ते 300 रुग्ण संख्याची सरासरी आढळते. यातील अनेकांची तपासणी होत नाही. लक्षणे असून असे रुग्ण फिरताना दिसतात.

सर्व गावांमध्ये काही अपवाद वगळता पुढील अडचणी प्रकर्षाने आढळतात. गाव पातळीवर समित्यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. तपासणी प्रक्रिया थंडावली. नागरिक सूचनांचे पालन करत नाहीत, क्वारंटाईन होणे टाळले जाते. अपवाद वगळता अनेक तलाठी सहकार्य करत नाहीत. आरोग्य कर्मचारी कमी संख्येने असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. एमआयडीसी परिसरात भरणारा बाजार डोकेदुखी ठरत आहे.

एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांमध्ये शहर व तालुक्यातुन येणारे हजारो कामगार एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे अनेक कुटुंबेच बाधित होत आहेत. तालुक्यातील मृतांची संख्या सुद्धा अधिकृत संखोपेक्षा जास्त असून ही बाब गंभीर होऊ नये यासाठी शहराप्रमाणेच नगर तालुका व एमआयडीसी मध्ये कडक लाकडाऊन लावून त्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी गावकरी राजकारण बाजूला ठेवून काम करत आहेत, याठिकाणी परिस्थिती चांगली दिसून येत आहे. मात्र, अशा गावांची संख्या खूप कमी आहे. प्रशासन म्हणून आम्ही तर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. मात्र, समाजाकडून लवकरात लवकर मानसिक बदल होणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त गावांमध्ये जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तपणे जाहीर केले जावे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

- उमेश पाटील, तहसीलदार, नगर तालुका.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com