नगर तालुक्यातील भोयरे पठारला बिबट्या पिंजर्‍यात अडकला

नगर तालुक्यातील भोयरे पठारला बिबट्या पिंजर्‍यात अडकला
बिबट्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नगर तालुक्यातील भोयरे पठार गावच्या परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले करत उच्छाद मांडलेल्या आणि नरभक्षक बनू पाहणारा बिबट्या मंगळवारी पहाटे पिंजर्‍यात अडकला असून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.

नगर तालुक्यातील भोयरे पठार व हिवरे बाजार या दोन गावांच्या सिमावर्ती भागात बिबट्याचा वावर होता. या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. बिबट्याने काही पाळीव कुत्रे व प्राण्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिक रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्यास घाबरत होते. पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या नरभक्षक बनू पाहत होता. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

त्यानुसार वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल गावडे, वनरक्षक आर. सी. अढागळे, सुरक्षा रक्षक सखाराम येणारे यांच्यासह पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा वावर असलेल्या शेतात चार ते पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजर्‍याकडे बिबट्या यावा यासाठी भक्ष म्हणून पिंजर्‍याजवळ शेळी बांधण्यात आली होती. मंगळवारी पहाटे बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजर्‍याजवळ आला व पिंजर्‍यात अलगद जेरबंद झाला. त्यानंतर सकाळी वनविभागाच्या पथकाने सदरचा पिंजरा ताब्यात घेऊन नगरच्या विभागीय कार्यालयात आणला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com