नगर तालुक्यात कर्डिले यांचा वरचष्मा

निवडणुकीत 18 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा || महाविकास आघाडीला मिळाली 8 ठिकाणी सत्ता
नगर तालुक्यात कर्डिले यांचा वरचष्मा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या गटाने वर्चस्व मिळविले. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने 18 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. मतमोजणी ठिकाणी विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तालुक्यात 8 गावांत सत्ता परिवर्तन झाले तर वाळकी, सारोळा कासारसह 19 गावांत मातब्बरांना पुन्हा सत्ता राखण्यात यश आले.

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.18) मतदान झाले होते. मतमोजणीस मंगळवारी सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयात सुरूवात झाली. दुपारी दीड वाजता सर्व निकाल हाती आला. तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्यात बहुतांशी ठिकाणी भाजप विरूध्द महाविकास आघाडी असे चित्र होते.

वाळकी येथे शरद बोठे यांनी तर सारोळा कासार येथे रवींद्र कडूस यांनी दहा वर्षांची सत्ता पुन्हा अबाधित राखण्यात यश मिळवले. नारायण डोहो येथे माजी सभापती भानुदास कोतकर गटाने सत्ता परिवर्तन केले. बाबुर्डी बेंद येथेही कोतकर व आ. निलेश लंके गटाने एकत्र येत सत्ता खेचून आणली. उक्कडगाव येथे सरपंच नवनाथ म्हस्के, दहिगाव येथे सरपंच मधुकर म्हस्के तर राळेगण म्हसोबा येथे सरपंच सुधीर भापकर यांनी वर्षानुवर्षांची गावाची सत्ता कायम राखत सौभाग्यवतींना सरपंचपदी विराजमान केले.

सोनेवाडी येथे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे व स्व. ज्ञानदेव दळवी गटाने पुन्हा सत्ता राखली. कापुरवाडी, नेप्ती, नांदगाव, शेंडी या बड्या ग्रामपंचायतींवर कर्डिले गटाचा बोलबाला दिसून आला. खातगाव येथे सेना-भाजप युतीचा विजय झाला. मदडगाव येथे भाजपचे अनिल शेडाळे यांच्या 10 वर्ष ताब्यात असलेली गावची सत्ता शिवसेनेच्या साहेबराव शेडाळे यांनी उलथून टाकली. कर्डिले गटाने 18 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून राष्ट्रवादीने 6, शिवसेनेने 2 तर काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिध्द केले आहे.

जखणगावमध्ये नोटाला जास्त मते

जखणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने नोटानंतर दुसर्‍यास्थानी मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित केले. या प्रभागात सुनील झिरवडे व अरूण सूर्यवंशी हे दोन उमेदवार होते. झिरवडे यांना नोटानंतर दुसर्‍या क्रमांकाची 144 मते तर सूर्यवंशी यांना 112 मते मिळाली होती. त्यामुळे झिरवडे यांना विजयी घोषित करण्यात आले.

दोन सदस्य चिठ्ठीव्दारे विजयी घोषित

टाकळी खातगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाकडून चिठ्ठीव्दारे विजय घोषित करण्यात आला. आसमा शेख व प्रिती नरवडे हे सदस्य चिठ्ठीव्दारे विजयी जाहीर करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com