दक्षिण नगरमधून दोन हजार प्रतिज्ञापत्र भरून देण्याचे नियोजन

शिवसेना || नगर शहर, तालुका, पानेर, श्रीगोंदा तालुक्यातून 30 हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट
शिवसेना
शिवसेना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनःश्च पुष्टीकरीत आहे, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र व यातील मजकूर सत्य व बरोबर असल्याचे शपथपत्र नगरमधील शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांकडून भरून घेतले जात आहे. नगर शहर, नगर तालुका, पारनेर तालुका व श्रीगोंदे तालुका या चार तालुक्यांतून अशीसुमारे दोन हजार प्रतिज्ञापत्रे व शपथपत्रे भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दर तीन वर्षांनी होणारी शिवसेनेची प्राथमिक सदस्य नोंदणीही सुरू करण्यात आली असून याअंतर्गत या चारही तालुक्यांतून सुमारे 30 हजाराच्या सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यस्तरीय शिवसेनेत फूट पडून आता महिना झाला आहे. सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी तब्बल 40 आमदार पक्षातून बाहेर पडले व त्यांनी एकनाथ शिंदे यांना नेते म्हणून निवडले. त्यानंतर भाजपच्या 106 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करीत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर अधिकार सांगितला आहे.

यावर आता येत्या 8 ऑगस्टला निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. पक्ष चिन्ह धनुष्यबाण यावर अधिकार ठाकरेंचा की शिंदेंचा याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावा-गावांतील शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र व शपथपत्र भरून घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

नगरचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर, नगर तालुका, पारनेर व श्रीगोंदा या चार तालुक्यांतून ही मोहीम सुरू झाली आहे. याशिवाय दक्षिण नगर जिल्ह्यातील राहुरी, कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव या अन्य तालुक्यांतून तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील नेवासे, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, कोपरगाव, संगमनेर वअकोले या तालुक्यांतूनही अशी मोहीम सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

नगरला झाली सुरुवात

दोन दिवसांपूर्वी युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्या हस्ते शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची व प्रतिज्ञापत्र-शपथपत्र भरून घेण्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, अमोल येवले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनासभासद नोंदणी शुल्क 2 रुपये असून, चार तालुक्यांतून 30 हजार सभासद करण्याचे उद्दिष्टआहे तर प्रतिज्ञापत्र व शपथपत्र 100 रुपयांचे असून अशी सुमारे 2 हजार प्रतिज्ञा पत्रे-शपथपत्रे भरून घेण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, नगर मनपाच्या नगरसेवकांपैकी काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे तर काहींनी पक्ष प्रमुख ठाकरेंसमवेत राहणे पसंत केले आहे.

असे आहे...प्रतिज्ञापत्र व शपथपत्र

मी....शिवसेनेचा सदस्य आहे व शिवसेनेच्या...या पदावर कार्यरत असून, गांभीर्यपूर्वक खालील प्रतिज्ञापत्र घोषीत करत आहे... माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंददुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळनिष्ठा आहे. मी असेही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रती मी पूर्ण निष्ठाव्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनःश्च पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे, असे यात नमूद केले गेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com