शिंदे गट शिवालयातून कामकाज करणार

जिल्हाप्रमुख शिंदे || अनेकजण संपर्कात असल्याचा दावा
शिंदे गट शिवालयातून कामकाज करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवालय हे आमचे उर्जास्थान असून येथूनच कामकाज करणार असल्याचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांच्या मंगळवारी नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर बुधवारी दुपारी या पदाधिकार्‍यांनी नेता सुभाष चौकातील शिवसेनेच्या शिवालयास भेट देऊन स्व. अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी शिंदे बोलत होते. जुने-नव्यांना बरोबर घेऊन कामकाज करणार असून अनेकजण संपर्कात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

यादरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोणीही पदाधिकारी शिवालयाकडे फिरकले नाहीत. याठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली व तोफखाना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाप्रमुख शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख सुभाष लोंढे, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, काका शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवालयास भेट दिली. यावेळी स्व. अनिल राठोड अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या.

शिंदे म्हणाले की, स्व. अनिल राठोड यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व भाजपच्या सहकार्याने शहरात निर्माण करणार आहोत. अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसांत उत्तर जिल्हाप्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. नगर शहरातही अनेकजण संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप हे हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. त्यामुळे आम्ही प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नगर शहरासाठी मोठा विकास निधी देणार आहेत. शहरातील सर्व डीपी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच अमृत पाणी योजनेची स्थिती बिकट झालेली आहे. यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत. चारशे-पाचशे कोटी रुपयांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून अनेक वर्षे झाली. त्यांना अद्याप काही करता आले नाही, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केली होती. त्यासंदर्भात जिल्हाप्रमुख शिंदे यांनी प्रा. गाडे यांच्यावर टीका केली. आमच्या बरोबर कितीजण आहेत. हे लवकरच दिसेल. 1984 साली भाजपचे दोन खासदार होते. आता भाजपची काय स्थिती आहे, हे सर्वांना दिसत आहे. उत्तर जिल्हाप्रमुखाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. हे नाव सर्वपरिचित असून ते आम्ही सध्या उघड करणार नाही, असे शिंदे म्हणाले.

आगामी मनपा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांची युती होणार असून मनपा निवडणुकीत युतीचा भगवा फडकणार आहे, असे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांच्या निवडणुकीतही यश मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com