नगर-शिर्डी महामार्गावर दुरूस्ती

नगर-शिर्डी महामार्गावर दुरूस्ती

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devalali Pravara

दै. सार्वमतच्या वृत्ताचा दणका व कृती समितीच्या आंदोलनाचा इशारा यापुढे प्रशासनाने नमते धोरण घेत नगर - मनमाड राज्यमहामार्गावरील राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेसमोरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात आले असून दोन दिवसांत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात होणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

नगर - मनमाड राज्यमहामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने प्रशासनाविरुद्ध स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या मध्यस्थीने तसेच रोडवरील खड्डे डांबरीकरण करून बुजविण्याची निविदा निघाली असल्याचे संबंधितांनी सांगून येत्या दोन दिवसांत काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून कृती समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

कृती समितीच्या आग्रहास्तव राहुरी फॅक्टरी येथील स्टेट बँक समोरील खड्डे प्रशासनाकडून मुरूम टाकून का होईना, तात्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणी केली होती. याबाबतचे वृत्त दै. सार्वमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. दै. सार्वमतच्या वृत्ताची व कृती समितीची दखल घेऊन तहसीलदार शेख यांच्या सुचनेने ते खड्डे तातडीने 15 ऑगस्ट रोजी बुजविण्यात येऊन प्रवाशांना रस्ता प्रवासायोग्य करण्यात आला आहे.

कृती समितीच्यावतीने प्रशासनाच्या या कारवाईने समाधान व्यक्त करण्यात आले आहे व संबंधित ठेकेदाराचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासनाकडून लवकरच डांबरीकरण करून रोडवरील इतर खड्डे बुजविली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी कृती समितीचे वसंत कदम, वैभव गाढे, ज्ञानेश्वर मोरे, राजेंद्र बोचकरे, अमोल वाळुंज, विठू राऊत, पाटील तसेच नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com