नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी
सार्वमत

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी

रेल्वेच्या विभागीय बैठकीत हरजित वधवा यांची मागणी

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे, नगर-बीड-परळीचे काम लवकर करण्यात यावे, नगरला रेल्वेचे हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, आदी मागण्या आग्रहीपणे हरजीतसिंग वधवा यांनी सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या 2020-2022 च्या पहिल्या बैठक मांडल्या.

यावेळी विभागीय रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता यांनी या मागण्यांचे स्वागत करत करोना काळात वधवा यांनी पुरविलेले जेवणाचे डब्बे तसेच केलेल्या कामाचे कौतुक केले, तसेच वधवा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीची 2020-2022 ची पहिली बैठक विभागीय रेल्वे मॅनेजर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झूम अ‍ॅपद्वारे सोमवारी पार पडली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी प्रदीप हिरडे यांनी सांगितले की, रेल्वेचे वेळापत्रक तयार होत असून त्यात अनेक बदल होणार आहेत. या वेळापत्रकात नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच पुण्यासाठी 22 रेल्वे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाच्या नगरमधून फक्त चार गाड्या सुरू आहेत. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेची गरज असून 6 फेब्रुवारीला लोकसभेत खा. डॉ. सुजय विखे यांनी देखील ही गाडी सुरू करण्याची मागणी केली असल्याचे वधवा यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. याशिवाय नगर रेल्वे स्थानक येथे रेल्वेचे हॉस्पिटल उभारणे आवश्यक आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी वधवा यांनी केली.

नगर-बीड मार्गाबाबत सांगताना वरिष्ठ मंडल इंजिनीअरिंग समन्वयक गौतम यांनी सांगितले, की कडा-आष्टी येथे जागा अधिग्रहण बाकी आहे. तसेच अंमळनेर येथे घाट सेक्शन असल्याने कामाला उशीर होत आहे. मात्र, यावर्षी किमान नगर-बीडच्या दरम्यान 35 ते 40 किलो मीटरपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

नगरचे रेल्वे स्थानक हे जंक्शन झाले असून त्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 लवकर तयार करण्यात यावे, अशी मागणी वधवा यांनी केली. रेल्वेचे अतिरिक्त विभागीय मॅनेजर वी. के. नागर, सिनियर डीओएम रवींद्र वंजारी, सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार चाक्या, तसेच नगर येथील सदस्य एस. बी. रुणवाल, श्रीरामपूर, लातूर, सोलापूर, पंढरपूर, दौंड, बार्शी, कुलबर्गी येथील सदस्य या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते . त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com