पुणे-नगर महामार्गावर पंधरा दिवस अपघाताविना

ब्लॅकस्पॉट, दुभाजक दुरूस्तीचा परिणाम
पुणे-नगर महामार्गावर पंधरा दिवस अपघाताविना

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर - पुणे महामार्गावरील ब्लॅकस्पॉट व दुभाजकांच्या दुरूस्तीच्या परिणामी मागील महिन्यातील अपघाताची मालिका खंडित झाली असून गेल्या पंधरा दिवसांत एकही मोठा अपघात अथवा जिवित हनीचा एकही अपघात नोंदला गेला नसल्याचे समोर आले आहे.

ऑगस्ट महिन्यात सततच्या अपघाताने अहमदनगर पुणे महामार्ग मोठा चर्चेत आला.रस्त्यावरील अतिक्रमणे, महामार्गावरील फोडलेले रस्ता दुभाजक याच्या मुळे हे अपघात झाले. पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकावे यांनी पुढाकार घेत पारनेरचे तहसीलदार अवळकंठे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महामार्ग पोलीस अधिकारी, बांधकाम कंपनी अधिकारी याची बैठक घेऊन तातडीने उपाययोजनेला सुरुवात केली.

रस्ता दुरूस्तीमध्ये 20 ते 25 दुभाजक पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहेत. ब्लॅकस्पॉटवर आवश्यक तेथे दिशादर्शक व सूचना फलक लावले आहेत. गाव, शाळा, चौफुला रस्ता दाखवणारे फलक लावले असून रस्त्याच्या दुतर्फा साईटपट्ट्या भरणे, रेडीअम लावणे, झेब्रा पट्टे मारणे, दुभाजकावरील गवत माती काढणे, कॅटआय लावणे आदी कामे युद्ध पातळीवर शेकडो कामगारांच्या मदतीने चालू आहेत ,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम अधिकारी घोडके व कंपनी अभियंता भडके यांनी दिली .

पोलीस निरिक्षक गोकावे, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी घोडके, कंपनी माँनेजर कर्नल भानुदास नारखडे, अभियंता घोडके यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली तसेच बुधवारी संपूर्ण कामाची पाहणी केली. यावेळी पोलीस निरिक्षक गोकावे यांनी ब्लॅक स्पॉटच्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करत गेल्या पंधरा दिवसांत अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगत संबंधितांचे अभिनंदन केले.

अहमदनगर - पुणे मार्गावरील अपघातांची मालिका व ब्लॅक स्पॉट याबाबत सार्वमत या दैनिकाने पाठपुरावा केला. दररोज येणार्‍या बातम्यांमुळे सर्व अधिकारी, कंपनीचे अधिकारी यांनी या कामांना प्राधान्य देऊन युद्ध पातळीवर काम हाती घेतले. यामुळे ब्लॅक स्पॉट व दुभाजक दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली. यामुळेच आता अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.

- नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक सुपा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com