
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रस्त्याच्या कामासाठी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बस स्टॉप येथे आंदोलन करणार्या शिवसेनेचे नगरसेवक ज्ञानेश्वर येवले, संग्राम कोतकर, शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह 40 जणांविरूध्द जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली आहे.
नगरसेवक ज्ञानेश्वर शिवाजी येवले, शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम संजय कोतकर, नगरसेवक विजय पठारे, डॉ. श्रीकांत चेमटे, हर्षवर्धन कोतकर, प्रतिक बारसे, विठ्ठल कोतकर, संदेश शिंदे, पप्पू भाले, प्रशांत गारकर, दीपक डोंगरे, संतोष हुलगे, अभिजीत कोतकर, साई भागवत, सुनीता सातपुते, नगरसेविका सुनीता कोतकर (सर्व रा. केडगाव) व इतर अनोळखी 20 ते 25 जणांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे व संग्राम कोतकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 31) नगर-पुणे महामार्गावर केडगाव शिवारात अंबिकानगर बस स्टॉप समोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. नगर-पुणे महामार्ग रोखून धरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.