नगरच्या खासगी हॉस्पिटलमधील ‘त्या’ सात मृत्यूंचे गुढ कायम

नातेवाईकांकडून ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा दावा || रुग्ण गंभीर असल्याने मृत्यू झाल्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा
नगरच्या खासगी हॉस्पिटलमधील ‘त्या’ सात मृत्यूंचे गुढ कायम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले तरी नगर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सात रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा दावा रूग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. मात्र हे मृत्यू संबंधीत रूग्ण अन्य आजारांमुळे गंभीर असल्याने झाल्याचा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आला.

एकीकडे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असताना दुसरीकडे एमआयडीमधील खासगी ऑक्सिजन प्लँटसमोर टँकरच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यातच शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री करोना उपचार सुरू असणार्‍या 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बुधवारी सकाळी समोर आली.

त्यानंतर प्रशासन आणि आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत माध्यम प्रतिनिधीसमोर खुलासा करत रूग्णांचा मृत्यू झाल्याची कबूली दिली. परंतू, हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचा दावा त्यांनी केला. रूग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी सात करोना रुग्णांचा मृत्यू कसा झाला, याबाबत गुढ वाढले आहे.

रूग्णांचा मृत्यू झाला ही बाब खरी आहे. परंतू, या रूग्णांचा मृत्यू एकाच वेळी झालेला नाही. 24 तासांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. मृत्यू कशाने झाले, यामागील कारण काय आहे, या सर्व बाबी हॉस्पिटलमधील मृत्यू लेखापरीक्षणातून समोर येतील. याबाबत चौकशी करू.

- डॉ. अनिल बोरगे (मनपा वैद्यकीय अधिकारी)

ऑक्सिजनअभावी हॉस्पिटलमध्ये रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही. रूग्णांच्या नातेवाईकांनी तशी तक्रार दाखल केल्यास चौकशी करू.

- राकेश मानगावकर (पोलीस निरीक्षक, कोतवाली)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com