अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गुलाबी थंडीत फिरायला बाहेर पडलेल्या नगरकरांनी शुक्रवारी सकाळी धुक्याचा आल्हाददायक आनंद लुटला.

गारव्यात धुक्याचा आनंद घेतानाच बोचर्या थंडीलाही त्यांनी अंगावर घेतले.

शुक्रवारी सकाळी पहाटेपासूनच सर्वत्र धुके पसरले होते. जशी सकाळ होत गेली, तसे हे धुके वाढत गेले. कोरोनामुळे फिरणे बंद झालेले नगरकर गेल्या काही दिवसांपासून मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेतात.

त्यात थंडीच्या दिवसातील फिरणे आरोग्यास जास्त हितकारक असल्याने जॉगिंग पार्क, रस्ते, मोकळे मैदान येथे फिरायला येणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर सर्वत्र धुके दिसल्याने आनंद द्विगुणीत झाला. आपल्या आप्तस्वकीयांना भल्या सकाळी फोन करून बाहेर धुक्याचा आनंद घेण्याचे सांगण्यात आले.

दाट धुक्यामुळे वाहन चालकही सावध होते. हेडलाईट लावून वाहने सावकाश चालली होती. शहरातून जाणारे महामार्गावरही वाहनांची गती संथ होती. शहराच्या जवळ असलेल्या चांदबीबी महाल परिसर, पिंपळगाव रस्ता आदी ठिकाणी नागरिकांनी धुक्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली.

शहरातील सीना नदीवर असलेल्या आणि रेल्वेस्टेशनकडे जाणार्या लोखंडी पुलावरही अनेकांनी धुक्याचा आनंद लुटला. लाँगराईड मारत काहींनी मोकळ्या वातावरणातय या धुक्याचा आनंद घेतला. धुक्याचा एकीकडे आनंद घेत असतानाच ग्रामीण भागात मात्र यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. धुक्यामुळे पिकांवर रोग पडण्याची भीती काहींनी व्यक्त केली.