
करंजी | वार्ताहर| Karanji
नगर-पाथर्डी मार्गे (Nagar Pathardi Highway) जात असलेल्या महामार्गावरील मराठवाडी बारव ता. आष्टी गावाजवळ बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकडे (Shevgav) वीस हजार लिटर पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचे टायर फुटल्याने आग लागली. या आगीमुळे (Fire) मराठवाडी बारव परिसरामध्ये मोठा आगडोंब उसळला. पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग (Diesel Tanker Fire) लागल्याची माहिती समजताच नगर, पाथर्डी, आष्टी (Ashti) तालुक्यातील सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तब्बल दोन तासांनी टँकरला लागलेली आग विझवण्यात आली.
सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र टॅंकरला लागलेल्या आगीमुळे टँकरचा पूर्णपणे कोळसा झाला. तर या महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन अडीच तास ठप्प होती. या आगीमुळे मराठवाडी हारेवाडी बारव या मुख्य विद्युत लाईनच्या तारा देखील या आगीत वितळून महामार्गावर पडल्या असता त्या देखील स्थानिक ग्रामस्थांनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या रात्री बाजूला हटवल्या. पोलीस प्रशासनास स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदत केली.