पालिका निवडणुकीचा बिगूल वाजला

आचारसंहिता लागू : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक
पालिका निवडणुकीचा बिगूल वाजला

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. यात १७ जिल्ह्यांतील ९२ नगर पालिकांच्या निवडणुकांसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार आहे.

यात नगर जिल्ह्यातील १० पालिकांचा समावेश आहे. यात संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या ब वर्गातील पालिका, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी या क वर्गातील पालिका आणि नेवासा नगर पंचायतीचा समावेश आहे. शुक्रवारपासूनच निवडणुका होणाऱ्या पालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली असल्याचे आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यातील जनतेचे निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होते. अखेर निवडणूक आयोगाने ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकांना राज्य सरकार आणि विरोधक कसे समोरे जाणार, ओबीसी आरक्षणासाठी एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार प्रयत्न करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, निवडणुका होणाऱ्या पालिकांची प्रभाग रचना, आरक्षण सोडती अंतिम करण्यात आलेल्या आहेत. तसेच निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम देखील पूर्ण करण्यात आलेला आहे. तसेच मतदान केंद्राची यादी ९ जुलैला प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार निवडणूकांसाठी निवडलेल्या जिल्ह्यात आणि तालुक्यात मान्सूनमुळे निवडणुकांवर प्रभावाचा विचार करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

असा आहे कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार २० जुलै

उमेदवारी अर्ज उपलब्ध २२ ते २८ जुलै

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै

अर्जाची छाननी २९ जुलै

अर्ज मागे घेण्याची मुदत ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत

उमेदवारी अर्जावरील आक्षेप ८ ऑगस्ट

मतदानाचा दिनांक १८ ऑगस्ट

मतमोजणी आणि निकाल १९ ऑगस्ट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com