नगरमधील ’त्या’ ऑक्सिजन प्लँटवर होतेय गर्दी व गोंधळ

रुग्णालयाच्या नावाचा अनेकांकडून गैरवापर
नगरमधील ’त्या’ ऑक्सिजन प्लँटवर होतेय गर्दी व गोंधळ
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना नागापूर एमआयडीसीतील दोन ऑक्सिजन प्लँटवरून नगर शहर आणि ग्रामीण भागातील खाजगी रूग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

याठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत. रूग्णालयाच्या नावाखाली कोणीही ऑक्सिजन घेऊन जात आहे. महसूलचे अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांची उपस्थितीत वाटप सुरू असले तरी ऑक्सिजन वाटपावरून गोंधळ निर्माण होत आहे.

करोना रूग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हँटीलेटरवर बेडसाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. खाजगी रूग्णालयांकडून करोना रूग्णांच्या नातेवाईकांना एमआयडीसीतील प्लॅँटवर ऑक्सिजनचे सिलिंडर भरून आणण्यासाठी पाठविले जात आहे. यामुळे प्लँटवर गर्दी होत असून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रूग्णालयाच्या नावाने कोणीही ऑक्सिजन भरून घेऊन जात असल्याचे चित्र आहे. यामुळे खाजगी रूग्णालयात ऑक्सिजनची गरज असताना वेळेत ते मिळत नाही.

रूग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी अधिकृत व्यक्ती पाठविल्या जात नाही. रूग्णांच्या नातेवाईकांना त्याठिकाणे पाठविले जाते. यातून प्लँटवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. नगर इंडस्ट्रीयल गॅस व हायटेक एअर प्रॉडक्टस् या दोन प्लँटवर सध्या ऑक्सिजन निर्मिती सुरू आहे. त्याठिकाणी महसूलचे अधिकारी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे आठ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली ऑक्सिजनचे वाटप सुरू आहे. परंतू, खाजगी रूग्णालयांकडून अधिकृत व्यक्तींना आणण्यासाठी पाठविले जात नाही. रूग्णांच्या नातेवाईकांना पाठविले जाते. यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचे म्हटले जाते.

तर ऑक्सिजन मिळणार नाही- जिल्हाधिकारी

खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनचे सिलिंडर उत्पादकाकडून भरून आणण्यास सांगण्यात येते. ही बाब अयोग्य असून त्यामुळे उत्पादन प्लँटवर अनावश्यक गर्दी होते. रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचार्‍याला ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी प्राधिकृत करावे. या प्राधिकृत व्यक्तीस प्राधिकार पत्राशिवाय ऑक्सिजन सिलिंडर भरुन मिळणार नाही, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com