नगरबाजार समितीत वाराईच्या वादावरून कांदा लिलाव रखडले

नगरबाजार समितीत वाराईच्या वादावरून कांदा लिलाव रखडले

शिवसेनेचे संदेश कार्ले यांच्या आंदोलनानंतर दुपारी लिलाव सुरळीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना यांच्यातील वाराईच्या वादामुळे सकाळी दहा वाजता सुरू होणारे कांदा लिलाव तीन वाजता सुरू झाले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी गेटवर येऊन आंदोलन केल्यामुळे कांदा लिलाव सुरळीत चालू झाले.

नेप्ती उपबाजार समिती येथे गुरूवारी कांद्याचेे लिलाव होते. लिलावासाठी शेतकरी सकाळपासून बाजार समितीमध्ये येऊन बसलेले होते. सकाळी दहा वाजता सुरू होणारे लिलाव सुरूच झाले नाही. व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना यांच्यात चालू असलेल्या वादामुळे कांदा लिलाव बंद होते. याबाबत तोडगा काढण्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती, संचालक मंडळ यांच्यात बैठक चालू होती.

तीन वाजले तरी लिलाव चालू झाले. संतप्त शेतकर्‍यानी कांदा लिलाव चालू करावेत, यासाठी बाजार समितीच्या गेटवर बाह्यवळण रस्त्यावर आंदोलन चालू केले. आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी धाव घेतली. बाजार समितीचे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाजार समितीचे संचालक यांच्यात थोडा वादही झाला. त्यानंतर कांदा लिलाव सुरू झाले.

कांदा व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना यांच्यात वाराई या विषयावरून वाद झाला. याबाबत दोघांनी ताठर भूमिका घेतली. त्या दोघांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढला व कांदा लिलाव सुरळीत चालू केले. बाजार समितीने आत्तापर्यंत शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. बाजार समितीची विनाकारण बदनामी करू नये. व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वादामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली. याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करणार.

- अभिलाष धिगे, सभापती, बाजार समिती नगर.

कांदा लिलाव करण्यासाठी शेतकरी सकाळी वेळेच्या आधी आले. ट्रान्सपोर्ट व व्यापारी यांच्यात वाराईवरून वाद झाला. यामुळे बाजार समितीमधील लिलाव तीन वाजेपर्यंत बंद राहिले. याबाबत मार्केट कामिटीच्या पदाधिकार्‍यांची दोन वाजेपर्यंत मिटिंग चालू होती. मात्र, त्यांच्याकडून काहीच झाले नाही. शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. शेतकर्‍यांनी लिलाव चालू करावेत, यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. मी आल्यावर रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा गेटवर आंदोलन करू असे समजल्यावर मिंटिग अर्धवट सोडून गेटवर आले. व्यापारी व ट्रान्सपोर्ट याचा विषय मिटला. लिलाव सुरळीत चालू झाले असे सांगितले. शेतकरी उपाशीपोटी सकाळपासून उभे होते. सत्ताधार्‍यांनी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत.

- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com