नगरची बाजार समिती तीन दिवस राहणार बंद
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सालाबाद प्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून, श्रीक्षेत्र पंढरपूर पायी जाणारा दिंडी सोहळा शुक्रवार (दि.24) व शनिवारी (दि.25) या दोन दिवसांसाठी मुक्कामासाठी थांबणार आहे. तसेच रविवार (दि.26) प्रस्थान करणार आहे. या दिंडीचे भुसार व फळे भाजीपाला आवारात दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये 50 हजार वारकरी सहभागी आहेत.
त्या अनुषंगाने शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांसाठी समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व फळे भाजीपाला बाजार बंद राहणार आहे. तसेच शनिवारी नेप्ती उपबाजार येथील कांदा लिलाव बंद राहणार आहे. सोमवार (दि.27) पासून भुसार, फळे भाजीपाला व कांदा बाजार नियमित सुरू होणार आहे. यामुळे भुसार व कांदा फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवांनी बंद कालावधीमध्ये शेतमाल समितीच्या आवारात विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरचे प्रशासक किशन रावसाहेब रत्नाळे यांनी केले आहे. यावेळी सचिव अभय भिसे, सहसचिव बाळासाहेब लबडे, सचिन सातपुते, संजय काळे, भुसार विभाग प्रमुख सयाजी कराळे, भाजीपाला विभाग प्रमुख भाऊ कोतकर उपस्थित होते.