नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडल्याने सोमवारी राहुरी फॅक्टरीला आंदोलन

नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडल्याने सोमवारी राहुरी फॅक्टरीला आंदोलन

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

काही महिन्यापासून नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. दरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासाठी शांतीचौक मित्र मंडळाच्या वतीने सोमवार दि. 23 मे रोजी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले, गेल्या काही महिन्यांपासून नगर-मनमाड महामार्गाचे काम चालू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. बर्‍याच ठिकाणी रस्ता खोदून काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अनेक प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी गुहाफाटा नजीक मध्यप्रदेश येथील भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यामध्ये सात महिन्याच्या बालकासह चार जण जागेवर मयत झाले. हा रस्ता जणूकाही मृत्यूचा सापळा बनला आहे.

या रस्त्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराचे कामाकडे अजिबात लक्ष नाही. प्रवाशांच्या मृत्यूला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. त्यामुळे शांतीचौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, उपाध्यक्ष हर्षद ताथेड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 23 मे रोजी सकाळी नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन महसूल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. चक्काजाम आंदोलनात सामील होण्याचे आवाहन दीपक त्रिभुवन व आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com