नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू अपघातही वाढले

ठेकेदारावर कारवाईची मागणी
नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू
अपघातही वाढले

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड राज्यमार्गापैकी नगर ते कोपरगाव या राज्य मार्गाचे डांबरीकरणाचे काम शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी घेतले आहे. गुहा परिसरात चार महिन्यांपासून हे काम सुरू असून सुरक्षाविषयक नियमांचे कोणतेही पालन केले जात नाही. त्यामुळे अपघातात आठ जणांचे बळी गेले गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुजित वाबळे व ग्रामस्थांनी केली आहे.

निवेदन देताना तंटामुक्त कमिटी अध्यक्ष अशोक उर्हे, उपसरपंच अविनाश ओहोळ, रामा बर्डे, शिवाजी मांजरे, डॉ.विजय वाबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. हे निवेदन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिले आहे.चार महिन्यांपासून गुहापाट ते गुहा परिसरात रस्ता डांबरीकरण व सहापदरी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना कुठेही कामासंदर्भात प्रवासी, वाहनचालक सुरक्षितता यादृष्टीने फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. आजपर्यंत या परिसरात झालेल्या अपघातात आठ प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.

कंपनीला याबाबत सातत्याने सूचना देऊनही कंपनीने या सुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा या भागात दौरा असताना कार्यकर्त्यांनी या भागातील अपघाताच्या वाढत्या प्रमाणाविषयीचा प्रश्न त्यांच्याजवळ उपस्थित केला. मंत्री तनपुरे यांनी कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांना तातडीने बोलावून दिशादर्शक कामाच्या फलकाची माहिती देणारे विशेषतः रात्रीही दिसू शकतील, अशा रिफ्लेक्टर मध्ये हे फलक लिहिण्याच्या सूचना केल्या. कंपनीच्या नगर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व कामात तातडीने आवश्यक त्या सुधारणा होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना केल्या.

हे काम अत्यंत संथगतीने होत असून दररोज किमान एक तरी अपघात याठिकाणी होतो. एका बाजूने रस्ता पूर्णपणे खोदण्यात आलेला आहे. कुठे तो एकाच बाजूने खुला आहे. मात्र, त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी नियंत्रित करण्यासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे वाहतूक अधिक असुरक्षित, वेळ घेणारी झाली आहे. सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातूनच अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पुष्पा जयस्वाल व दोन भाविक, भागवत मनोहर ओहळ, वंदना विलास सौदागर, राहुल सुरेश ओहळ, पियुष बलमे, राम वाघ हे या भागात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडले. अमित संपत भोसले, अंबादास राजाराम डुक्रे हे गंभीर जखमी झाले. सुरक्षारक्षक नियमांचे रस्ता ठेकेदाराने पालन न केल्याने हे अपघात झाले आहेत. आणखी किती अपघात झाल्यावर ठेकेदाराला जाग येईल? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

Related Stories

No stories found.