नगर - मनमाड महामार्गाचे काम पंधरा दिवसांत सुरू

देशवासी कोव्हीडच्या संकटातून मुक्त होवोत, साईचरणी गडकरींची प्रार्थना
नगर - मनमाड महामार्गाचे काम पंधरा दिवसांत सुरू

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था लवकरच दूर होणार असून येत्या 15 दिवसांत रस्ता बांधकामाला सुरुवात करून एक वर्षात ्तो दर्जेदारपणे पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत व्यक्त केला आहे.

दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे खा. सुजय विखे पाटील यांनी स्वतः गाडी चालवत ना. गडकरी यांना राहुरी ते शिर्डी या दरम्यान नगर-मनमाड रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लगेचच ना. गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाची घोषणा केली. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यांच्या समवेत खा.डॉ सुजय विखे पाटील, शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, साईसंस्थानचे विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिर्डीत ना. गडकरींचे जल्लोषात स्वागत केले. दिवाळीपूर्वी साईबाबांचे दर्शन मिळाल्याचा् आनंद असून देशवाशी कोव्हीडच्या संकटातून मुक्त होवोत अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे सांगत गडकरींनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

ना.नितीन गडकरी यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी खासदार सुजय विखे पाटील, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून नगर - मनमाड महामार्गाची मोठी ्दुरवस्था झाली असून हा राज्यमहामार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला आहे. मात्र 490 कोटी रुपयांचे कंत्राट देऊनही रस्त्याचे काम अद्यापही सुरू होत नसल्याबाबत प्रसारमाध्यमांनी मंत्री गडकरी यांना विचारले असता नगर - मनमाड महामार्गाचे कामाचा आढावा घेतला असून येत्या 15 दिवसात रस्ता बांधकामाला सुरुवात करून एक वर्षात ्तो दर्जेदार रित्या पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत आहेत. ना. गडकरी यांच्या प्रतिक्रियेने या महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com