नगर-मनमाड महामार्गावर दुतर्फा वाहतूक सुरू

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
नगर-मनमाड महामार्गावर दुतर्फा वाहतूक सुरू

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

प्रशासनाचे लेखी आश्वासन देऊन रस्ता दुरूस्तीचे काम तसेच दुचाकी व हलक्या वजनांच्या साधनांसाठी दुतर्फा वाहतूक सुरू केल्याने नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने होणारे आंदोलन स्थगित केले आहे.

नगर-मनमाड महामार्गावर चालू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे या रस्त्यावर मागील महिन्यात झालेल्या अपघातात जोगेश्वरी फाटा, सूतगिरणीजवळ सहा प्रवाशी मृत्युमुखी पडले होते.याबाबत प्रशासनाने कुठलीही कार्यवाही या ठिकाणी न केल्यामुळे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने या रस्त्यावर प्रशासनाचा निषेध म्हणून दशक्रियाविधी आंदोलन 3 डिसेंबर रोजी केले होते.

त्यावेळी कृती समितीने आठ दिवसांत याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण दुतर्फा वाहतूक चालू करावी या मागणीचे पत्र प्रशासनास दिले होते. अन्यथा वसंत कदम यांनी आत्मदहन व देवेंद्र लांबे यांनी तहसील कचेरीत खड्डे खोदण्याचा इशारा दिला होता.

प्रशासनाने आंदोलनाचा धसका व जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन दि. 9 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून दि. 10 डिसेंबरपासून याठिकाणी दिशादर्शक तसेच दुचाकी व हलक्या स्वरूपाची वाहने या रस्त्यावरून सुरू केली आहेत. या स्वरूपाची उपाययोजना करण्याचे लेखी स्वरूपात पत्र कृती समितीचे वसंत कदम व देवेंद्र लांबे यांना तहसील कार्यालय राहुरी येथे दिले आहे. तसेच नवीन नगर-मनमाड रोडचे काम जानेवारी 2023 च्या महिना अखेरपर्यंत सुरू होईल, असेही लेखी आश्वासन दिले आहे.

यावेळी तहसीलदार फसियोद्दिन शेख, कृती समितीच्या सदस्यांसह नॅशनल हायवे अ‍ॅथोरीटीचे रिडचे प्रकल्प संचालक मिलिंद वाबळे, महेश मिश्रा, अभियंता अलोक सिंग, दिगविजय पाटणकर, मुजीफ सय्यद उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com