
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर एक ट्रक खड्ड्यात अडकल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल सहातास विस्कळीत झाली. याबाबत राहुरी पोलिसांना अनेकदा घटनेची माहिती देऊनही वाहतूक सुरळीत करण्यास कोणीही फिरकले नाही. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनीही संताप व्यक्त केला. शेवटी काही तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. त्यामुळे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक सुरळीत झाली.
नगर-मनमाड महामार्गावर शिर्डी आणि शिंगणापूर अशी दोन आंतरराष्ट्रीय देवस्थाने आहेत. त्यातच सुमारे आठहून अधिक साखर कारखाने आहेत. त्यामुळे हा महामार्ग नेहमीच वाहतुकीच्या वर्दळीमुळे गजबजलेला असतो. पर्यायाने या महामार्गावर रात्रंदिवस मोठी वाहतूक सुरू असते. गेल्या तीन महिन्यांपासून सहापदरणीकरणासाठी हा महामार्ग जोगेश्वरी आखाडा ते राहुरी फॅक्टरीपर्यंत एका बाजूला खोदण्यात आला असून सध्या या महामार्गावरून सुमारे सहा किमीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दररोज या महामार्गावर वाहतुकीचा चक्काजाम होतो. त्यातच राहुरीच्या वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरू आहे. तर महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम बंद पडून संबंधित ठेकेदाराने पळ काढल्याने हा महामार्ग साक्षात मृत्यूचा सापळा बनला असून अपघातात वाढ झाली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साठल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहुरी फॅक्टरी परिसरात या महामार्गावर 12 टायरचा ट्रक खड्ड्यात अडकला. तो नादुरूस्त झाल्याने व एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा चक्काजाम झाला. दरम्यान, पंढरपुराहून परतलेल्या वारकर्यांचीही वाहने चक्काजाममध्ये अडकून पडली. काही जागरूक नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोबाईलवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. मात्र, तब्बल सहातास कोणताही वाहतूक पोलीस तिकडे फिरकला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा भरपावसात सुमारे पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.