नगर- मनमाड महामार्गावर तिसरा बळी

राहुरी फॅक्टरी येथे कंटनेरने युवकाला चिरडले
नगर- मनमाड महामार्गावर तिसरा बळी

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

दुचाकीवरून घराकडे निघालेल्या औरंगाबाद येथील योगेश सहादेव सानप या 27 वर्षीय तरूणाचा नगर मनमाड रस्त्यावरील खड्याने बळी घेतल्याची दुर्देवी घटना शनिवारी दुपारी राहुरी फॅक्टरी परिसरात घडली.

दरम्यान राहुरी येथे एका तरुणाचा चार दिवसापूर्वी खड्यामुळे बळी गेल्यानंतर गुरुवारी डिग्रस फाट्यावर खड्यामुळे एका महिलेला आपला जिव गमवावा लागला. तर शनिवारी दुपारी राहुरी फॅक्टरी येथे एका तरुणाचा खड्यामुळे जिव गेला. आठवड्याच्या आत या रस्त्याने तिन बळी घेतले आहेत. हा रस्ता आणखी किती बळी घेणार? आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारला या बाबत जाग येणार आहे ? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

नगर मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक वर्षांपासून नागरीकांचीओरड सुरूच आहे. परंतू राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होऊनही नगर मनमाड रस्त्याचे दारिद्र्य कमी होईनासे झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊनही रस्त्याची अवस्था जैसै थै आहे. परिणामी अपघाताच्या घटना घडत असून अनेक निष्पाप लोकांना हकनाक जिव गमवावा लागत आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व स्विकारावे लागत आहे.

शनिवारी सकाळ पासून नगर-मनमाड मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तीन तासापासून वाहतूक ठप्प असतानाच नगर मनमाड रस्त्याने घरी श्रीरामपुर मार्गे औरंगाबादकडे जाणारा योगेश सानप रस्त्यावरील खड्याचा बळी ठरला आहे. राहुरी फॅक्टरी येथे नर्सिंग होम समोर असलेल्या मोठ्या खड्यामध्ये तरूणाची दुचाकी अडखळली. रस्त्याच्या कडेला मोठी कपार निर्माण झालेली आहे. त्या कपारीवरून दुचाकी खाली पडल्याने तो तरूण रस्त्यावर पडला. पाठीमागून आलेल्या कंटेनरच्याखाली तो तरूण सापडला. गंभीर मार लागल्याचे पाहून डॉ. योगेश पगारे, गणेश डावखर, श्रीकांत जाधव, ऋषि राऊत, मयुर घावटे, दादा शिरसाठ, महेश मोरे, संग्राम जाधव, तुषार सांगळे, वैभव मैड आदींनी तात्काळ धाव घेतली. नर्सिंग होमचे वैद्यकीय अधिकारी पी. बी गायकवाड यांनी तरुणावर उपचार सुरू केले. परंतु तरूणाला अधिक मार लागलेला असल्याने तो गतप्राण झाला. घटनेनंतर उपस्थितांनी रस्त्यावरील खड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

नगर - मनमाड राज्य महामार्गावर अनंत खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथिल नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने 15 ऑगष्ट रोजी स्वतंत्रदिनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. परंतू त्यावेळी राहुरीचे तहसिलदार शेख यांनी मध्यस्ती करुन संबधीत अधिका-याचे दोन दिवसात खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र घेण्यात आले होते.या गोष्टीला विस दिवस झाले तरी खड्डे बुजलेले गेले नाहीत. उलट या रस्त्यावर तिन बळी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत तिव्र भावना असून कृती समितीचे कार्यकर्ते अत्यंत संतप्त झाले असून कुठल्याही क्षणी अनोख्या पध्दतीने तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com