नगर-मनमाड मार्गावर जंगली महाराज आश्रम ते तीनचारी परिसरात खड्डेच खड्डे

नगर-मनमाड मार्गावर जंगली महाराज आश्रम ते तीनचारी परिसरात खड्डेच खड्डे

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील जंगली महाराज आश्रम ते तीनचारी परिसरात नगर मनमाड महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून साधे खड्डे देखील बुजवायला त्यांनी तयारी दाखवली नाही.

नगर-मनमाड महामार्गाची अवस्था तशी शिर्डी ते कोपरगाव परिसरात अत्यंत खराब झाली आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ते तीनचारी परिसरात नगर दोन ते पाच फुटाचे खड्डे पडल्याने या परिसरात मोठे अपघात होत आहेत. मोटरसायकल तसेच चारचाकी वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. अवजड वाहतूक करणारे कंटेनर तसेच मालवाहू गाड्यांना देखील या खड्ड्यातून वाहने काढताना नाकी नऊ येत आहे. अनेक वेळा मालवाहतूक करणारे टँकर तसेच कंटेनर या खड्ड्यामुळे पलटी झाले आहेत. खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये अनेक मोटरसायकल स्वरांचे अपघात होऊन काहींना अपंगत्व आले काहींना आपला प्राण गमावला आहे.

परिसरातील अनेक मोटरसायकल स्वरांना या खड्ड्यांमुळे मणके व पाटदुखीचे आजार जडले आहे. महाराष्ट्रात अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. मात्र या महामार्गाची अवस्था पाहून हे गुळगुळीत रस्ते पाहण्यासाठी आपण जिवंत राहू की नाही असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. या परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ प्रशासनाने बुजवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com