पाऊस आला धावून.. मुरूम गेला वाहून

राहाता शहरातील रस्ते खड्डयातून फुफाट्यात, अन् फुफाट्यातून पुन्हा खड्डयात !!
पाऊस आला धावून.. मुरूम गेला वाहून

राहाता | प्रतिनिधी

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासह राहाता (Rahata) तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नगर-मनमाड महामार्गाची (Nagar-Manmad Highway) पुरती दैना झाली आहे. मुरूम टाकून बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा (Public Works Department) चांगलाच उद्धार केला जात आहे.

मध्यंतरी थोड्याशा पावसाने राहाता शहरातून जाणाऱ्या नगर - मनमाड महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाने काहीशी विश्रांती घेताच सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमी प्रमाणे मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे महामार्गावर धुळीचा त्रास वाढल्याने नागरिकांना आणखी मनस्ताप सहन करावा लागला.

'दगडापेक्षा विट मऊ' असे म्हणत नागरिकांनी धुळीचा त्रास सहन करत प्रवास केला. परंतू सोमवारी ( 30 ऑगस्ट ) रात्री पासूनच तालुक्यात दमदार पाऊस झाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ पुन्हा उघडे पडले. या पावसाने राहाता शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून मुरूम टाकून बुजवलेले खड्डे जैसे थे झाले आहेत. त्यामुळे महामार्ग चिखलात हरवल्याचे चित्र असून ' पाऊस आला धावून, मुरूम गेला वाहून' असे म्हणण्याची वेळ वाहन चालकांसह राहातेकरांवर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com