नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांचा आणखी एक बळी

डिग्रस येथील महिलेचा अपघातात जागीच मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांचा आणखी एक बळी

डिग्रस |वार्ताहर| Digras

नगर मनमाड राज्य महामार्गाची अत्यंत दुरावस्ता झाली असून काल दि. 8 सप्टेबर रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्यावर मिराबाई तागड या मोटरसायकलवरून खाली पडल्याने पाठीमागून येणार्‍या कंटेनरच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीररित्या जखमी झाले आहेत.

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावचे रहिवाशी असलेले राधाकृष्ण तागड व त्यांची पत्नी मिराबाई तागड हे दि. 8 सप्टेबर रोजी सकाळी सात वाजे दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून डिग्रस येथून राहुरीकडे येत होते. दरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गावर डिग्रस फाटा येथे दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात आदळली. तेव्हा मोटारसायकलवर बसलेल्या मीराबाई तागड रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी नगरहून राहुरीच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन मिराबाई तागड यांचा जागीच मृत्यू झाला.

तर त्यांचे पती राधाकृष्ण तागड गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नगर येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. चार दिवसांपूर्वीच राहुरी येथील अजय बोरूडे या 28 वर्षीय तरूणाचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होऊन तो मयत झाला. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा नगर-मनमाड रस्त्याने मिराबाई तागड या 38 वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. नगर-मनमाड रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार ? हा रस्ता आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे. या घटनेतील मयत तागड यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, नवरा, सासू असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने डिग्रस परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com