
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने नगर-मनमाड महामार्गाच्या दुरूस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अद्यापही या महामार्गाची दुरूस्ती होत नसल्याने प्रवाशी व वाहनचाालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा महामार्ग साक्षात मृत्यूचा सापळा बनला असून आणखी किती जणांचे बळी घेणार? असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला आहे.
गेल्या वर्षभरापासून या महामार्गाची दुरूस्ती रखडली आहे. साक्षात केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या खडतर महामार्गावरून चारचाकी वाहनाने शिर्डी ते राहुरी विद्यापीठ असा प्रवास केला. त्यांच्या या महामार्गाची अवस्था निदर्शनास आली. त्यांनी पंधरा दिवसांतच या महामार्गाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांच्या आश्वासनाला दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही अद्याप या महामार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू झालेले नाही. त्यातच एकीकडे गॅसपाईपलाईनसाठी कोल्हारपासून महामार्गाच्या बाजूला मोठी खोदाई करण्यात आली असून त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत.
तर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने व दोन ट्रॉली जोडून ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टरही या महामार्गावरून बेफामपणे धावत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून चारचाकीसह दुचाकीस्वारांना या खड्ड्यांतून मार्ग काढणे अवघड झाले आहे. कोल्हारपासून नगरपर्यंत हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.
या महामार्गावरून सध्या ऊस वाहतूक, मुरूम व वाळू वाहतूक, दूध वाहतूक, प्रवासी वाहने, खासगी वाहने, परप्रांतात माल वाहून जाणारी वाहने यांची रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे. या महामार्गाची वहनक्षमता प्रतिदिनी 10 हजार वाहने इतकी राहिलेली आहे. मात्र, सध्या हा महामार्ग उखडलेला असतानाही प्रतिदिनी सुमारे 40 हजारांहून अधिक वाहने या महामार्गावरून बेफामपणे धावत आहेत. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या महामार्गाची परिस्थिती खालावली असून हा महामार्ग सध्या कोमात गेला आहे. हा महामार्ग तातडीने दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.