नगर-मनमाड महामार्ग गेला खड्ड्यात; महामार्गाची चाळण

नगर-मनमाड महामार्ग गेला खड्ड्यात; महामार्गाची चाळण

अपघातांची संख्या वाढली; राहुरीच्या ग्रामीण भागातही रस्त्यांची बोंबाबोंब

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असताना आता ग्रामीण भागातील रस्त्यांनाही अखेरची घरघर लागली आहे. राहुरीच्या पूर्व भागातही रस्त्यांना महारोगाची लागण झाली आहे. अनेक भागात रस्ते अक्षरशः उखडले असून अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसामुळे रस्ते अक्षरशः पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत. तर नगर-मनमाड महामार्गाची तर खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या रस्तांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, नगर-मनमाड महामार्गावरून जाणार्‍या आमदार-खासदारांना या रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

राहुरी तालुक्यात ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचे प्रश्न प्रलंबित आहेत. तिळापूर, वांजुळपोई भागातील रस्त्याचा खूप मोठ्या प्रमाणात बॅकलॉक आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात या भागातील एकाही रस्त्याचे काम झालेले नाही. रस्त्याच्या विकासाबाबत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

राहुरी तालुका विभाजनानंतर श्रीरामपूर मतदारसंघाला जोडलेल्या 32 गावांपैकी तिळापूर, वांजुळपोई, मांजरी, लाख, जातप, टाकळीमिया, त्रिंबकपूर, करजगाव, चांदेगाव या भागातील कुठलेही रस्ते अद्याप दुरूस्त झाले नाही. काही रस्ते तर ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने तेही वर्षाच्या आतच पावसाळ्यात चक्क वाहून गेले आहेत. राहुरीच्या पूर्वभागात अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा संगमेश्वर देवस्थान मंदिराकडे जाणारा तिळापूर हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे. या रस्त्यांवरून शेतकरी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे.

तिळापूर येथे श्रीक्षेत्र संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट क वर्गात समाविष्ट झालेले अतिशय मोठे देवस्थान आहे. मुळा आणि प्रवरा नदीच्या संगमावरती असलेल्या या पवित्र ठिकाणी हजारो भाविक येत असतात. परंतु या देवस्थानकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्त्याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधी, खासदार, मंत्री यांना निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. देवळाली प्रवरा-टाकळीमिया रस्ता, देवळाली प्रवरा-लाख रस्ता अतिशय दयनीय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना अनेक अपघात होत असून वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांना शारिरीक दुखापती होत आहेत.

दरम्यान, नगर-मनमाड महामार्गाची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी राहुरी फॅक्टरी व राहुरी येथील युवकांनी रस्ता दुरूस्ती कृती समिती स्थापन करून खड्ड्यात गाडून घेण्याचा इशारा दिला आहे. तर राहुरी येथे गणेश पवार या युवकाने खड्ड्यातच उतरून निषेध फलक घेऊन संबंधितांचे लक्ष वेधले आहे. नगरपासून कोल्हारपर्यंत नगर-मनमाड महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. दरदिवशी अपघातात अनेक प्रवाशी व वाहनचालक जखमी होत आहेत. पावसामुळे हा महामार्ग खड्ड्यात गेला आहे. याबाबत संबंधित विभागाचे आडमुठे अधिकारी मूग गिळून बसल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होण्याच्या मार्गावर आहे.

मागील वर्षी या महामार्गाचे केवळ खड्डे बुजविण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाने दिली होती. मात्र, गेल्या वर्षभरात एकही खड्डे बुजविण्यात आले नाही. मग हे 10 कोटी रुपये खड्ड्यात गेले का? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. तर काही भागात खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर करण्यात आला. मात्र, पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्ड्यांबरोबरच संबंधित विभागाच्या निष्क्रियतेचे पितळ उघडले पडले आहे. तर रस्तेच धड नसल्याने तालुक्याच्या अनेक गावांत एसटीही जात नसल्याने तेथील विद्यार्थी, कामगार व व्यापार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. तर नादुरूस्त रस्त्यांमुळे गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय उपचारही मिळत अनेक महिला दगावल्या असून तर काही महिला रस्त्यातच प्रसूत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी आणि आमदार-खासदारांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com