
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्यालगत व नगर- मनमाड महामार्गालगत नाल्यापर्यंतची अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने सोमवारी कारवाई करून हटविली. परिसरातील इतर अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांच्या सुचनेनुसार क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव, देविदास बिज्जा आदींसह इतर कर्मचार्यांनी ही कारवाई केली. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरील बाजूस महाविद्यालयालगत असलेल्या टपर्या, तसेच पत्रकार चौकापासून मनमाड महामार्गावर नाल्यालगत असलेली अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवली. याच परिसरातील इतर अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेले अतिक्रमण मनपाकडून काढण्यात आले असले तरी रुग्णालयासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहने पार्क केली जातात. यामुळे रुग्णालयासमोर नेहमी वाहतूक कोंडी होते. या अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.